सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड मदरशांवर मोठा निर्णय देणार; CJI च्या यादीत 'ही' महत्त्वाची प्रकरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 03:51 PM2024-10-30T15:51:24+5:302024-10-30T15:51:59+5:30
CJI DY Chandrachud: सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डीवाय चंद्रचूड 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत असून, निवृत्तीपूर्वी ते 5 महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देणार आहेत.
Supreme Court CJI Retirement : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश (CJI) डीवाय चंद्रचूड (DY Chandrachud) येत्या 10 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांच्याकडे सीजेआय म्हणून अधिकृत पाच दिवस शिल्लक आहेत. या पाच दिवसांत CJI 5 महत्त्वाच्या खटल्यांवर निकाल देणार आहे. त्यामुळेच या निर्णयांकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.
सर्वोच्च न्यायालय सध्या दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे बंद आहे. आता 4 नोव्हेंबरला न्यायालय सुरू होईल. CJI चंद्रचूड यांच्या खंडपीठाला 4 ते 8 नोव्हेंबर या कालावधीत अनेक मोठ्या प्रकरणांमध्ये निकाल द्यायचा आहे. शनिवार आणि रविवार असल्याने 9 आणि 10 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालय बंद राहणार आहे, त्यामुळे 8 नोव्हेंबर हा चंद्रचूड यांचा CJI म्हणून शेवटचा दिवस असेल. जाणून घ्या त्या पाच प्रकरणांबद्दल, ज्यावर CJI निकाल देणार आहेत.
1. मदरसा कायदा प्रकरण
ज्या पाच प्रकरणांमध्ये सरन्यायाधीशांनी आपला निकाल द्यायचा आहे, त्यापैकी हे सर्वात महत्त्वाचे आहे. सुप्रीम कोर्टाने 22 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेतल्यानंतर मदरसा कायद्याप्रकरणी आपला निर्णय राखून ठेवला होता. मंगळवार, 22 ऑक्टोबर रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली, ज्यामध्ये उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळ कायदा 2004 घटनाबाह्य घोषित करण्यात आला होता.
2. AMU चा अल्पसंख्याक दर्जा
अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या अल्पसंख्याक दर्जाबाबतही दीर्घकाळ सुनावणी सुरू आहे. या प्रकरणी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने गेल्या सुनावणीदरम्यान निर्णय राखून ठेवला होता. आता हे पाहावे लागेल की CJI AMU ला अल्पसंख्याक संस्था दर्जा देण्याच्या बाजूने की विरोधात.
3 LMV परवाना प्रकरण
LMV परवाना प्रकरणी शेवटची सुनावणी 21 ऑगस्ट रोजी झाली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. हलक्या मोटार वाहन परवानाधारकांना 7500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या गाड्या चालविण्याची परवानगी आहे की नाही, हा या प्रकरणातील वाद आहे. या प्रकरणामुळे अशा वाहनांच्या अपघातांशी संबंधित विमा दाव्यांबाबत वाद निर्माण झाला आहे.
4. दिल्लीतील रिज परिसरात झाडे तोडणे
दिल्लीतील रिज परिसरात बेकायदेशीरपणे झाडे तोडल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून झाडे कशी तोडण्यात आली, हे यात सांगण्यात आले. या प्रकरणीही CJI चंद्रचूड यांच्या खंडपीठाने महत्त्वपूर्ण निर्णय द्यायचा आहे.
5. संपत्तीचे पुनर्वितरण
मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या खंडपीठात घटनेच्या कलम 39(बी) वरही सुनावणी सुरू आहे. ही सामान्य फायद्यासाठी मालमत्तेच्या पुनर्वितरणाशी संबंधित आहे. मालमत्तेच्या वाटपाबाबत काँग्रेसने ही राजकीय चर्चा सुरू केली होती, त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहोचले.