मंदिरामध्ये निकाह होणारे खेरा सधन
By admin | Published: September 12, 2014 02:11 PM2014-09-12T14:11:18+5:302014-09-12T16:17:06+5:30
लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
आग्रा, दि. १२ - लव्ह जिहादवरुन उत्तरप्रदेशमधील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आग्राजवळील खेरा सधन या गावातील हिंदू - मुस्लिमांना आंतरधार्मीय विवाह करण्यात काहीच गैर वाटत नाही. विशेष बाब म्हणजे या गावातील एकाच कुटुंबातील काही जण हिंदू तर काही जण मुस्लिम असून धर्मनिरपेक्षतेचा वस्तूपाठच या गावाने घालून दिला आहे.
आग्र्यापासून ५० किलोमीटर अंतरावर खेरा सधन हे गाव आहे. औरंगजेबाच्या काळात या गावातील ग्रामस्थांना इस्लाम धर्म स्वीकारा अन्यथा ठार मारु अशी धमकी देण्यात आली होती. त्या काळात ग्रामस्थांनी भीतीपोटी इस्लाम धर्म स्वीकारला होता. ही गावाची ऐतिहासिक पार्श्वभूमी. स्वातंत्र्यानंतर काही हिंदूत्ववादी संघटनांनी ग्रामस्थांनी पुन्हा हिंदू धर्मात परतावे यासाठी अथक प्रयत्न केले. यानंतर काहींनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारला तर काहींनी मुस्लिम म्हणून राहणेच पसंत केले. उत्तरप्रदेशमध्ये जातीय हिंसा वाढत असतानाच या गावाने हिंदू - मुस्लिम सुखानेही राहू शकतात याचा आदर्शच निर्माण केला आहे. गावातील एकाच कुटुंबातील चार पैकी दोन भाऊ हिंदू आहेत. तर दोघे जण मुस्लिम. हेच चित्र गावातील अनेक घरांमध्ये दिसते. गावात हिंदू - मुस्लिम तरुणतरुणींचे सर्रास लग्न होते व यावर कोणाचाही आक्षेप नसतो. 'मला लव्ह जिहाद हा वाद निरर्थक वाटतो. माझी आई खुशनूमा मुस्लिम तर वडिल कमलेश सिंह हे ठाकूर आहेत. माझी बहिण सीताने इंझमामशी लग्न केले, माझी पत्नी शबानाला आमच्या मुलाचे नाव संतोष ठेवायचे आहे, यातच सर्वकाही आले' असे या गावात राहणारा विक्रम सिंह सांगतो.
हिंदू - मुस्लिम एकोप्याची अनेक उदाहरणं गावात आहेत. ५५ वर्षीय शौकत अली यांचा लहान भाऊ राजू सिंह याने नुकतेच लाजोशी लग्न केले. लाजो ही सुनील ठाकूर व रेश्मी यांची मुलगी आहे. हा निकाह गावातील मंदिरातच पार पडला. हिंदू पूजेसाठी दर्ग्यात जातात आणि मुस्लिम मंदिरांमध्ये जातात.
आमच्या पूर्वजांनी औरंगजेबाने दिलेल्या प्रस्तावानुसार इस्लाम धर्म स्वीकारला. सूंता करणे, मांस खाणे आणि मृतदेहाला पुरणे या तीन गोष्टींचे आम्ही प्रामुख्याने पालन करतो असे गावातील ज्येष्ठ नागरिक सांगतात. तर गावातील तरुणांना इतिहासाशी घेणदेणंच नाही. आम्हाला इतिहासात जायचे नाही. आमच्या गावात वेगळेपण आहे. जगा आणि जगू द्या हेच आमचे सूत्र आहे असे या गावातील एका तरुणीने सांगितले.