नियंत्रण सुटलेल्या ई-बसची 17 वाहनांना धडक, 6 जणांचा मृत्यू 12 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 08:52 AM2022-01-31T08:52:50+5:302022-01-31T08:55:21+5:30
घंटाघर येथून टाटमिल येथे ही बस जात होती. त्यावेळी, वाहनाला धडक दिल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगाने घेऊन जाण्याच्या नादात टाटमिल चौकातील एका उभ्या असलेल्या डंपरला धडकली
कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे रविवारी रात्री भीषण अपघाताची घटना घडली. या अपघातात एका बसने तब्बल 17 वाहनांना जोरदार धडक दिली. या दुर्दैवी घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शहरातील टाटमिल चौकात या ई-बसचे नियंत्रण सुटले अन् ती एकामागोमाग एक अशा 17 गाड्यांवर जाऊन धडकली.
घंटाघर येथून टाटमिल येथे ही बस जात होती. त्यावेळी, वाहनाला धडक दिल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस वेगाने घेऊन जाण्याच्या नादात टाटमिल चौकातील एका उभ्या असलेल्या डंपरला धडकली. त्यानंतर, ड्रायव्हरने घटनास्थळावरुन पलायन केले आहे. ई बसची जबाबदारी आणि मेन्टेनन्सचे चालन करणाऱ्या पीएमआय एजन्सीने घटनेबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
उत्तर प्रदेश: कानपुर के घंटाघर से टाटमिल चौराहे की ओर जा रही एक बस दुर्घटना ग्रस्त हुई।
— ANI_HindiNews (@AHindinews) January 30, 2022
पूर्वी कानपुर के DCP प्रमोद कुमार ने बताया, “सूचना मिलते ही मौके पर पुलिस और एम्बुलेंस भेजी गई। दुर्घटना में 5-6 लोगों की मृत्यु की जानकारी मिली है। बस चालक की तलाश और राहत कार्य जारी है।” pic.twitter.com/NRVhfERgpo
हॅरिसगंज रेल्वे पुलावरुन उतरताच या ई-बसने कृष्णा हॉस्पीटलजवळून राँग साईडने धावायला सुरूवात केली होती. त्यात, बसने 2 कार, 10 दुचाकी, 2 ई-रिक्षा आणि 3 टेम्पोला धडक देऊन टाटमिलकडे पुढे जात होती. या घटनांमुळे रस्त्यावर मोठा जनकल्लोळ झाला. त्यानंतर, टाटमिल येथे एका डंपरला बसने जोराची धडक दिली. त्यानंतर, चालकाने धूम ठोकली. या दुर्घटनेत एकू 6 जणांचा मृत्यू झाला असून 12 जण जखमी आहेत.
दरम्यान, मृत पावलेल्यांपैकी तिघांची ओळख पटली असून इतरांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यात येत आहे. शुभम सोनकर, ट्विंकल सोनकर, अरसलान यांची ओळख पटली आहे. जखमींवर टाटमिल येथील कृष्णा हॉस्पीटल आणि हैलट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची दखल घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.