चांदण्या रात्री ताजमहाल पाहण्यासाठी ई-तिकीट
By admin | Published: August 23, 2015 03:41 AM2015-08-23T03:41:31+5:302015-08-23T03:41:31+5:30
मूर्तिमंत प्रेमाचे प्रतीक असलेला आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल चांदण्या रात्री पर्यटकांना पाहता येणार असून, त्यासाठीची तिकिटे आॅनलाईन खरेदी करता येणार
आग्रा : मूर्तिमंत प्रेमाचे प्रतीक असलेला आणि जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ताजमहाल चांदण्या रात्री पर्यटकांना पाहता येणार असून, त्यासाठीची तिकिटे आॅनलाईन खरेदी करता येणार आहेत. ही तिकिटे आधी बुकिंग करण्याऐवजी ज्या चांदण्या रात्री ताज पाहायचा आहे, त्याच दिवशी दुपारी ३ वाजेपर्यंत आॅनलाईन तिकीट खरेदी करता येणार आहे.
केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री महेश शर्मा यांनी एका पत्रपरिषदेत येथे सांगितले की, याबाबतच्या एका प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली असून, लवकरच आदेश जारी करण्यात येईल.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सध्या पर्यटकांना व्यक्तिगतरीत्या हजर राहून तिकीट खरेदी करावे लागते. चांदण्या रात्री ताज पाहण्याची वेळ रात्री ८.३० ते १२ वाजेपर्यंत असते. यासाठी प्रत्येक पर्यटकाला ३० मिनिटांचा वेळ दिलेला असतो. पौर्णिमेच्या आधीच्या दोन रात्री आणि नंतरच्या दोन रात्री म्हणजेच एकूण पाच रात्री ताज पाहता येतो. १७व्या शतकातील ताज पाहण्यासाठी पर्यटकांना पश्चिम दरवाजाने जाण्याची परवानगी देण्याचीही तयारी सुरू आहे. सध्या पूर्वेच्या दरवाजानेच पर्यटकांना प्रवेश दिला जातो. त्यामुळे स्थानिक नागरिकांची अडचण होते. कारण त्यावेळी त्यांच्या येण्या-जाण्यावर बंधने येतात.
ताजच्या मागील मेहताब बागही विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तेथूनही पर्यटकांना ताज पाहता येऊ शकेल. (वृत्तसंस्था)
ब्रिटिशकालीन झुंबर कोसळले..
जगातील सात आश्चर्यांपैकी असलेल्या ताजमहालमधील ब्रिटिशकालीन झुंबर (दीपवृक्ष) कोसळले. त्याचे वजन ६० किलो असून ते सहा फूट उंच व चार फूट रुंद आहे. लॉर्ड कर्झन यांनी ते भेट दिले होते व १९०५मध्ये ते शाही द्वारावर लावण्यात आले होते.
या प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली आहे. ते कोसळण्याचे कारण अद्याप पुढे आले नसले तरी खूप जुने असल्यामुळे ते कोसळले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. झुंबर कोसळले त्यावेळी तेथे कोणी नव्हते.