जर्मनीसह ४३ देशांना ई-व्हिसाची सुविधा
By admin | Published: November 24, 2014 01:59 AM2014-11-24T01:59:25+5:302014-11-24T01:59:25+5:30
अमेरिका, जर्मनी, इस्रायल आणि पॅलेस्टाईनसह ४३ देशांच्या पर्यटकांना लवकरच बहुप्रतीक्षित इलेक्ट्रॉनिक व्हिसा मिळणार आहे.
नवी दिल्ली : अमेरिका, जर्मनी, इस्रायल आणि पॅलेस्टाईनसह ४३ देशांच्या पर्यटकांना लवकरच बहुप्रतीक्षित इलेक्ट्रॉनिक व्हिसा मिळणार आहे. २७ नोव्हेंबरपासून ही सुविधा सुरू होणार आहे. पर्यटन मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, गृहमंत्री राजनाथसिंग आणि पर्यटनमंत्री महेश शर्मा या सुविधेचा प्रारंभ करतील. रशिया, ब्राझील, जर्मनी, थायलंड, संयुक्त अरब अमिरात, युक्रेन, जॉर्डन, नॉर्वे, मॉरिशस या देशांच्या पर्यटकांना पहिल्या टप्प्यात या सुविधेचा लाभ मिळेल.
इंडियन असोसिएशन आॅफ टूर आॅपरेटर्सचे अध्यक्ष सुभाष गोयल यांनी सांगितले की, हा निर्णय पर्यटन क्षेत्रासाठी ऐतिहासिक आहे. आमची ही खूप जुनी मागणी होती. यामुळे आता ई-व्हिसाप्रणाली सुरू करण्याच्या उद्योगाला चालना मिळेल.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेक्सिको, केनिया, फिजीच्या पर्यटकांनाही या सुविधेचा लाभ देण्याचा विचार सुरू आहे. ई-व्हिसा सुरू करण्यासाठी सॉफ्टवेअरसह सर्व तयारी पूर्ण झाली आहे. ही सुविधा देशातील ९ आंतरराष्ट्रीय विमानतळांवर देण्यात येईल. यात दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, कोची, तिरुवअनंतपूरम आणि गोवा विमानतळांचा समावेश आहे.
प्राथमिक यादीतील काही देश वगळता इतर सर्व देशांना आगामी २ वर्षांमध्ये ही सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे. पाकिस्तान, सुदान, अफगाणिस्तान, इराण, इराक, नायजेरिया, श्रीलंका आणि सोमालिया हे देश वगळता इतर सर्व देशांना टप्प्याटप्प्याने ई-व्हिसाची सुविधा मिळेल.(लोकमत न्यूज नेटवर्क)