सैनिकांना पहिल्यांदाच लघुपटाच्या माध्यमातून मिळणार ई-व्होटिंगचे धडे
By Admin | Published: January 4, 2017 05:52 PM2017-01-04T17:52:30+5:302017-01-04T17:55:22+5:30
सैनिकांचं निवडणुकीतील मतदानाचे योगदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवी शक्कल लढवली आहे.
ऑनलाइन लोकमत,
नवी दिल्ली, दि. 4 - सैनिकांचं निवडणुकीतील मतदानाचे योगदान वाढवण्यासाठी निवडणूक आयोगानं नवी शक्कल लढवली आहे. सैनिकांमध्ये मतदानाच्या प्रचासाराठी निवडणूक आयोग ई-पोस्टल बॅलेट यंत्रणेवर आधारित एका लघुपटाची निर्मिती करणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा लघुपट पहिल्यांदा लेह, राजस्थान, विशाखापट्टणम आणि जोधपूरमध्ये दाखवण्यात येणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालयाकडून परवानगीही घेण्यात आली आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास संस्था या लघुपटाची निर्मिती करणार आहे. या लघुपटाचा कालावधी 10 ते 15 मिनिटांचा असणार आहे. लघुपटाला लवकरात लवकर बनवण्याच्या दृष्टीनं तयारी सुरू आहे.
निवडणूक आयोग पहिल्यांदा उत्तर प्रदेश निवडणुकीत ई-पोस्टल बॅलेट सिस्टीम लागू करणार आहे. एका रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशमधून जवळपास दीड लाख सैनिक सीमेवर कार्यरत आहेत. सैनिकांमध्ये नव्या यंत्रणेबाबत जागृती निर्माण होण्यासाठी या लघुपटाचा प्रयोग करण्यात येत आहे.
पुद्दुचेरीच्या एका फेरनिवडणुकीत ई-पोस्टल बॅलेट वापरण्यात आलं होतं. निवडणूक आयोगाच्या मतानुसार, लघुपटाच्या माध्यमातून दूर दूरवरच्या विभागात पोहोचणे सहजशक्य होणार आहे. तसेच ही ई-पोस्टल बॅलेट सिस्टीम पूर्णतः सुरक्षित असल्याचा दावाही निवडणूक आयोगानं केला आहे.