'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 02:18 PM2024-09-24T14:18:18+5:302024-09-24T14:18:51+5:30
खाद्य पदार्थांमध्ये भेसळ केली जात असल्याच्या घटना समोर आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत.
तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या लाडूमध्ये भेसळयुक्त तूप वापरल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी खाद्य पदार्थ आणि पेय विक्री करणाऱ्या स्टॉल्स, रेस्टॉरंट, ढाबे, हॉटेल आणि इतर ठिकाणांबद्दल महत्त्वाचे आदेश दिले आहेत. उच्च स्तरीय बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली.
उत्तर प्रदेशात खाण्या-पिण्याची ठिकाणे असलेल्या दुकाने, ढाबे, रेस्टॉरंट आणि हॉटेलच्या ठिकाणी मालक, मॅनेजर यांची नावे दर्शनी भागात लावणे अनिवार्य असल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. खाद्य पदार्थ वा पेयांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बैठकीत दिले.
उच्च स्तरीय बैठकीत बैठकीत काय झाले?
खाद्य पदार्थांमध्ये भेसळ केल्याच्या घटना समोर आल्या. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी (24 सप्टेंबर) लखनौमध्ये अधिकाऱ्यांच्या उच्च स्तरीय बैठक घेतली. या बैठकीत उत्तर प्रदेशातील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, ढाब्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
ज्यूस, डाळी आणि इतर खाद्य पदार्थांमध्ये भेसळ करून विक्री करणे, खपवून घेतले जाणार नाही. अशा ठिकाणांची तपासणी करण्यात यावी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याचे पोलिसांकडून उलटतपासणी केली जाईल.
खाद्य पदार्थ अथवा पेय विक्री करणाऱ्या ठिकाणी मालक, मॅनेजर यांची नावे दर्शनी भागात लावणे अनिवार्य करण्यात यावे. भेसळ केल्याचे आढळल्यास मालक, मॅनेजरवर कठोर कारवाई करा, असे योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.