भारतात जन्मानंतर केवळ 28 दिवसांमध्ये दगावतात 6 लाख मुले - युनिसेफ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 04:36 PM2018-02-20T16:36:16+5:302018-02-20T16:37:11+5:30
दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
नवी दिल्ली- दरवर्षी भारतामध्ये जन्म झाल्यावर सुरुवातीच्या 28 दिवसांमध्येच दगावणाऱ्या बाळांची संख्या 6 लाख इतकी असल्याचे युनिसेफच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. बालमृत्यूबाबत युनिसेफने मंगळवारी अहवाल जाहीर केला. असे असले तरी गेल्या पाच वर्षांमध्ये भारतात बालमृत्यूंमध्ये घट झाल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. जगातील एकूण 184 देशांची आकडेवारी या अहवालातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. भारताचा या यादीमध्ये 31 वा क्रमांक आहे. भारतात अर्भक मृत्यूचे प्रमाण 25.4 (प्रति 1000 जन्म) असल्याचे त्यात म्हटले आहे.
बाळाच्या जगण्याच्या दृष्टीने त्याच्या जन्मानंतरचे पहिले 28 दिवस अत्यंत महत्त्वाचे असतात. पहिल्या महिन्याभरात बाळाचा मृत्यू होण्याची सर्वाधिक शक्यता असते. जगभराच्या सरासरीनुसार जन्मलेल्या प्रत्येक 1000 बाळांमागे 19 बालके दगावतात. संपूर्ण जगाचा विचार केल्यास 2016 साली जन्मल्यावर पहिल्याच आठवड्यात 26 लाख अर्भकांचा मृत्यू झाला. त्यातील 10 लाख बालके जन्माच्या पहिल्याच दिवशी दगावली तर जवळपास दहा लाख बालके जन्मल्यावर एका आठवड्याच्या कालावधीत दगावली. युनिसेफने दिलेल्या माहितीनुसार, या बालकांचा मृत्यू विविध आजारांमुळे, अकाली जन्म, बाळंतपणाच्या वेळेस निर्माण होणार प्रश्न, संसर्ग अशा विविध कारणांमुळे झाला. 0 ते 5 वर्षे या कालावधीत होणाऱ्या मृत्यूमध्ये 1990-2015 या कालावधीत 66 टक्के घट झाली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये सुधारलेल्या आरोग्य सेवा आणि राहणीमान यामुळे बालमृत्यूचे प्रमाण घटले आहे.