मोदींच्या यशाचे गमक आधीच्या संघकार्यात

By admin | Published: July 13, 2017 04:45 AM2017-07-13T04:45:54+5:302017-07-13T04:45:54+5:30

देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आ

In the earlier team of Modi's predecessors, | मोदींच्या यशाचे गमक आधीच्या संघकार्यात

मोदींच्या यशाचे गमक आधीच्या संघकार्यात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांचा आधी गुजरातचे मुख्यमंत्री व आता देशाचे पंतप्रधान म्हणून जगाला दिसणारा उज्ज्वल प्रवास त्यांनी पूर्वी संघ स्वयंसेवक म्हणून केलेल्या ‘अप्रसिद्ध’ कामांमुळेच शक्य झाला आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी बुधवारी येथे सांगितले.
‘सुलभ इंटरनॅशनल’चे संस्थापक डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी मोदींवर लिहिलेल्या ‘‘मेकिंग आॅफ ए लेजंड’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यानंतर भागवत म्हणाले की, मोदी संघाचे स्वयंसेवक म्हणूनच काम करत राहिले असते तर संघ परिवाराबाहेरच्या फार थोड्यांनाच त्यांची खरी ओळख होऊ शकली असती. पण संघाने मात्र तरीही त्यांचे महत्त्व ओळखलेच असते.
गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी मोदी एक संघ स्वयंसेवक म्हणून जसे होते तसेच आजही आहेत आणि जगभर मिळत असलेल्या प्रसिद्धी व प्रशंसेने त्यांच्या व्यक्तिमत्वात व नेतृत्वगुणांत काहीही
फरक पडलेला नाही, असे सांगून ते म्हणाले की, मोदींमध्ये कष्ट करण्याची तयारी, धाडस, संयम, बुद्धिमत्ता, कणखरपणा आणि निर्धार असे अनेक गुण आहेत. काहीही करणे अशक्य आहे असे मानत नाहीत व ते शक्य करण्यासाठी आवश्यक तो खंबीरपणा दाखवतात.
भागवत म्हणाले की, लोकांचे लक्ष मोदींच्या व्यक्तिमत्वावर केंद्रित होणे स्वाभाविक आहे. त्यांंच्यासारख्या यशस्वी व्यक्तीने त्यासाठी केलेल्या परिश्रमाचीही लोकांनी नोंद घ्यायला हवी. यादृष्टीने हे पुस्तक उपयुक्त आहे. त्यातून मोदी जसे भासतात, तसेच वास्तवातही आहेत, हे जगाला समजेल. स्वातंत्र्यानंतर आजवर काय करायला हवे याविषयीच बोलले गेले. पण आता त्या गोष्टी प्रत्यक्षात होऊ लागल्या आहेत. कारण आता प्रत्यक्ष काम केले जात आहे. दोन हजार वर्षांपूर्वी जगात भारताला जी प्रतिष्ठा होती ती पुन्हा प्राप्त करून त्याहूनही पुढे जाण्याचे काम करावे लागणार आहे. हे काम खूप मोठे आहे व एकटे सरकार त्यासाठी पुरे पडणार नसल्याने प्रत्येक नागरिकाने त्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे, असे भागवत म्हणाले. काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात सोमवारी अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची जगभर निषेध होत असताना भागवत त्यावर काय बोलतात, याचे औत्सुक्य होते. पण त्यांनी भाषणात त्याचा उल्लेखही केला नाही.
भाजपा अध्यक्ष अमित शहा यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी प्रामुख्याने मोदी सरकारने हाती घेतलेल्या विविध विकास योजनांचा उल्लेख केला व या सर्वांचा परिणाम म्हणून सन २०२४पर्यंत भारताचे चित्र आमूलाग्र बदललेले असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
>मोदी उत्तम ठेकेदार!
सरसंघचालक म्हणाले की, लोकांना आपल्या कल्याणासाठी मोदींच्या रूपाने कर्तबगार ठेकेदार मिळाला आहे. पण सर्व त्यांच्यावर सोपवून लोक स्वत: झोपून राहतील, असा धोका आहे. तसे होता कामा नये. लोकांनी मोदींवरील पुस्तके वाचून त्यांचे गुण अंगी बाणवायला हवेत.
धर्माच्या नेतृत्वानेच कल्याण
वृंदावन येथील एका संतपुरषाशी झालेल्या चर्चेचा हवाला देऊन भागवत म्हणाले की, जेव्हा धर्म नेतृत्व करेल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल. धर्म याचा अर्थ सत्य, करुणा व आंतर्बाह्य शुचिता. हे साध्य करण्यासाठी कठोर तपश्चर्या करावी लागते. समाजात करुणा नसेल तर अनर्थ होईल.

Web Title: In the earlier team of Modi's predecessors,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.