आधी होते १०० कोटी उपाशी, आता झालेत २०० कोटी काैशल्यवान हात- पंतप्रधान मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 06:24 AM2023-09-04T06:24:36+5:302023-09-04T06:24:51+5:30
‘सबका साथ सबका विकास’ जगकल्याणाचे माॅडेल
नवी दिल्ली : बऱ्याच कालावधीपासून भारत हा १०० कोटी उपाशी पाेट असलेल्या लाेकांचा देश आहे, असे समजले जात हाेते. मात्र, आता ही धारणा बदलली असून, आता १०० कोटींपेक्षा अधिक महत्त्वाकांक्षी बुद्धिवंत लाेक, २०० कोटींपेक्षा अधिक काैशल्यवान हात आणि काेट्यवधी तरुणांचा देश म्हणून आता भारताकडे बघितले जात आहे. वर्ष २०४७ पर्यंतचा काळ आपल्या सर्वांसाठी फार माेठी संधी घेऊन आला आहे. पुढील १ हजार वर्षांपर्यंत स्मरणात राहील, असा विकासाचा पाया रचण्याची संधी या काळात राहणाऱ्या भारतीयांकडे आहे. २०४७ पर्यंत आपला देश विकसित देशांमध्ये सामील हाेईल, असा ठाम विश्वास पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी व्यक्त केला आहे.
भारताच्या अध्यक्षतेखाली जी-२० शिखर परिषदेचे नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर राेजी आयाेजन हाेणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान माेदी यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचे बदलते स्वरूप, भारताचा आर्थिक विकास, जागतिक पातळीवर देशाचे वाढते महत्त्व, सायबर सुरक्षा, कर्जाचा विळखा, जैवइंधनाचे धाेरण इत्यादींबाबत ठाम भूमिका मांडली. आपल्या कल्पनेतला २०४७ मधील भारत कसा असेल, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. मोदी म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतरच्या जगात नवी रचना अस्तित्वात आली. त्याचप्रमाणे काेराेना महामारीनंतर जगात नवी व्यवस्था आकार घेत आहे. जगाचा जीडीपीकेंद्रित दृष्टिकाेन आता मानवकेंद्रित हाेत आहे. त्यात भारत एका मध्यस्थाची भूमिका पार पाडत आहे.
माेदी म्हणाले...
जगाप्रति आमचे शब्द आणि दृष्टिकाेन केवळ विचारांच्याच स्वरूपामध्ये नव्हे, तर भविष्यातील राेडमॅपच्या रूपानेही स्वीकारले जात आहेत.जीडीपी कितीही असाे, प्रत्येकाचा आवाज महत्त्वाचा आहे. भारताच्या जी-२० अध्यक्षतेमुळे अनेक सकारात्मक परिणाम समाेर येत आहेत.
रेवडी संस्कृतीवर पंतप्रधान म्हणाले...
विकसनशील देशांसाठी जागतिक कर्जाचे संकट चिंतेचा विषय आहे. अनेक राज्यांनी माेफतच्या सुविधा, वस्तू वाटण्याचे धाेरण स्वीकारले. याचे क्षणिक राजकीय लाभ मिळतील. मात्र, दीर्घ कालावधीचा विचार केल्यास याचे फार माेठे सामाजिक आणि आर्थिक मूल्य माेजावे लागू शकते. बेजबाबदार आर्थिक धाेरणे आणि लाेकप्रियतावादाचा सर्वाधिक परिणाम सर्वांत गरीब वर्गावर हाेताे.
‘भारत आता केवळ बाजारपेठ नव्हे’
आर्थिक आव्हानांशिवाय
मानवतेला प्रभावित करणारी इतर अनेक महत्त्वपूर्ण आणि तात्कालिक आव्हानेदेखील आहेत, याची जाणीव काेराेना महामारीने जगाला करून दिली. भारताने आर्थिक विकास, तंत्रज्ञानातील प्रगती तसेच संस्थागत वितरणासाठी सामाजिक पायाभूत सुविधेत मानवकेंद्रित विकासाचे माॅडेल सादर केले. जगासमाेर ते आज आदर्श बनले आहे. भारताने उचललेल्या माेठ्या पावलांची जगभरात चर्चा हाेत आहे.
n ज्या देशाला आतापर्यंत एक बाजारपेठ म्हणून पाहिले जात हाेते, ताे आता जागतिक आव्हानांचे उत्तर म्हणून समाेर येत आहे.
एक लाख प्रतिनिधींनी पाहिला ‘४डी’ भारत
देशभरात २००हून अधिक विभागीय बैठकांच्या माध्यमातून जी-२० देशांच्या एक लाखाहून जास्त प्रतिनिधींनी विविध भागात जाऊन ‘४डी’ भारत पाहिला. ‘४डी’ म्हणजे, भारताची डेमाेग्राफी, डेमाेक्रेसी, डायव्हर्सिटी आणि डेव्हलपमेंट. यामुळे गेल्या दशकात लाेक कसे सक्षम झाले आहेत, हे या प्रतिनिधींनी पाहिले, असे पंतप्रधान म्हणाले.
सारेच झाले चकित
जगाला ज्या उपायांची गरज आहे, त्यापैकी अनेक उपाय आपल्या देशात वेगाने आणि माेठ्या प्रमाणावर आधीपासून यशस्वीरीत्या लागू झाले आहेत. हे पाहून प्रतिनिधी चकित झाल्याचे पंतप्रधान म्हणाले.
यूएनमध्ये सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व हवे
जगाच्या बदलत्या स्वरुपानुसार संयुक्त राष्ट्रात सुधारणांचे पंतप्रधानांनी जाेरदार समर्थन केले. २१व्या शतकात २०व्या शतकातील मध्यकालीन वृत्ती चालू शकत नाही. सर्व पक्षांचे संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रतिनिधित्व हवे, हे सुनिश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या सुधारणा झाल्या पाहिजे, असे माेदी म्हणाले.