कॅन्सल तिकिटांतून करोडोंची कमाई; रेल्वेला ३ वर्षांत वेटिंग लिस्ट तिकिटाद्वारे मिळाले १,२२९ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 01:44 PM2024-03-22T13:44:01+5:302024-03-22T13:45:03+5:30
रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटावर रेल्वेकडून कॅन्सलेशन शुल्क आकारले जाते, त्यातून हा पैसा रेल्वेला मिळतो.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सरकारला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागात समावेश असलेल्या रेल्वेला तिकिटे विकून उत्पन्न मिळते, हे तर सर्वच जाणतात; पण विकलेली तिकिटे रद्द केल्यानंतरही रेल्वेला कोट्यवधी रुपयांची कमाई होते, याची फारशी कोणाला माहिती नसते. रद्द केल्या जाणाऱ्या तिकिटावर रेल्वेकडून कॅन्सलेशन शुल्क आकारले जाते, त्यातून हा पैसा रेल्वेला मिळतो.
मध्य प्रदेशचे माहिती अधिकार कार्यकर्ता विवेक पांडे यांनी दाखल केलेल्या एका माहिती अधिकार अर्जावर रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, २०२१ ते २०२४ या कालावधीत कॅन्सल वेटिंग लिस्टच्या तिकिटाद्वारे रेल्वेला १,२२९ कोटी रुपये मिळाले. याद्वारे मिळणारे उत्पन्न दरवर्षी वाढत चालले आहे. प्रवासी सोयीसाठी तिकिटे रद्द करतात, परंतु यातून रेल्वेचा फायदा होतो.
दिवाळीच्या काळात मिळाले १० कोटी
- गेल्या वर्षी ५ ते १७ नोव्हेंबर २०२३ या दिवाळीच्या सप्ताहात ९६.१८ लाख तिकिटे रद्द करण्यात आली. त्यातून रेल्वेला १०.३७ कोटी रुपये मिळाले. या काळात मोठ्या प्रमाणात ये-जा करीत असतात.
- आरएसी/वेटिंग लिस्टचे तिकीट रद्द केल्यास प्रवाशाला ६० रुपये शुल्क लागते. एसी फर्स्ट क्लास/ एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट रद्द करण्यासाठी सर्वाधिक २४० रुपये शुल्क लागते.
- वर्ष रद्द तिकिटे कमाई
- २०२१ २.५३ कोटी २४२.६८ कोटी
- २०२२ ४.६ कोटी ४३९ कोटी
- २०२३ ५.३६ कोटी ५०५ कोटी
- २०२४* ४५.८६ लाख ४३ कोटी