पृथ्वीवर लघुग्रह आदळणे अटळ!
By admin | Published: June 29, 2017 12:37 AM2017-06-29T00:37:36+5:302017-06-29T00:37:36+5:30
अवकाशात असलेल्या असंख्य लहान-मोठ्या लघुग्रहांपैकी एखादा मार्गभ्रष्ट होऊन पृथ्वीवर येऊन आदळण्याची भीतीदायक शक्यता सदोदित कायम आहे.
पॅरिस : अवकाशात असलेल्या असंख्य लहान-मोठ्या लघुग्रहांपैकी एखादा मार्गभ्रष्ट होऊन पृथ्वीवर येऊन आदळण्याची भीतीदायक शक्यता सदोदित कायम आहे. साडे चार अब्ज वर्षांच्या आयुष्यात पृथ्वीने असे आघात अनेक वेळा सोसलेही आहेत. यापुढील अशी टक्कर नेमकी केव्हा होईल हे ठामपणे सांगता न येणे आणि अशी दुर्घटना अपेक्षित असूनही ती टाळण्यास काहीही करता न येणे ही वैज्ञानिकांच्या दृष्टीने सर्वाधिक चिंतेची बाब आहे.
कितीही अनिश्चितता असली तरी याचा निरंतर अंदाज घेत राहणे अपरिहार्य आहे. यादृष्टीने वैज्ञानिकांचा दोन प्रकारचा अभ्यास सुरू आहे. एक म्हणजे, संभाव्य धोका ठरू शकतील असे किती लघुग्रह अवकाशात आहेत, याची मोजदाद करणे. आणि दुसरे, यापैकी कोणता उपग्रह पृथ्वीवर केव्हा आदळू शकेल, याचा आडाखा बांधणे.
खगोलभौतिक शास्त्रज्ञ अशा संभाव्य धोकादायक दगडांचे व लघुग्रहांचे वर्गीकरण आकारानुसार करतात. कारण धोका हा त्यांच्या आकारावर अवलंबून आहे. यात काही मिमी आकाराच्या दगडांपासून ते १० किमी लांबीच्या महाकाय लघुग्रहांचाही समावेश होतो. एवढ्याच आकाराचा एक लघुग्रह ६.५ कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर आदळल्याने भूचर डायनोसॉरच्या सर्व प्रजाती विनष्ट झाल्या होत्या. वैज्ञानिकांनी आतापर्यंत या आकारमानाचे ९० टक्के लघुग्रह हुडकले आहेत. त्यांच्यापासून पृथ्वीला नजिकच्या काळात कोणताही धोका नसल्याचा निष्कर्षही काढला आहे.
पण खरी चिंता आहे १५ ते १४० मीटर लांब या आकारमानाच्या लक्षावधी लघुग्रहांचा नेमका मागोवा घेण्याची. याच वर्गात मोडणारा ४० मीटर आकाराचा एक खगोलीय दगड ३० जून १९०८ रोजी सैबेरियात तुंगुस्का येथे पृथ्वीवर आदळला होता. त्या आघाताने दोन हजार चौ. किमी परिसरातील आठ कोटी वृक्ष जळून खाक झाले होते. अगदी अलिकडे म्हणजे सन २०१३ मध्ये याहूनही लहान म्हणजे २० मीटर आकाराच्या एका खगोलीय दगडाचा पृथ्वीकडे झेपावत असताना मध्य रशियात चेल्याबिन्स्क शहराजवळ आकाशात विस्फोट झाला होता. त्यातून निर्माण झालेला ऊर्जेचा लोळ हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बच्या २७ पट क्षमतेचा होता व त्यामुळे सुमारे पाच हजार इमारतींच्या खिडक्यांच्या काचा चक्काचूर होण्यासह १,२०० हून अधिक लोक जखमी झाले होते. अशा धोक्यापासून बचाव करण्याचा कोणताही खात्रीशीर उपाय अजून तरी सापडलेला नाही. मात्र सैंधांतिकदृष्ट्या अनेक कल्पना वैज्ञानिकांनी मांडल्या आहेत. पृथ्वीकडे झेपावणारा लघुग्रह अण्वस्त्राने नष्ट करणे, लेसर किरणांचा मारा करून त्याचा भुगा करणे, अंतराळयानाने त्याला इतरत्र नेऊन सोडणे किंवा जोरदार धक्का देऊन त्याची दिशा बदलणे इत्यादींचा समावेश आहे. हे सर्व अद्याप फक्त कागदावरच आहे.
३० जून ‘लघुग्रह दिन’
तुंगुस्का, सैबेरिया येथील घटनेचे स्मरण करण्यासाठी आणि अवकाशात स्वैर संचार करणाऱ्या लघुग्रहांपासून असलेल्या संभाव्य धोक्याविषयी जागृती करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने ३० जून हा ‘जागतिक लघुग्रह दिवस’ म्हणून जाहीर केला आहे. या लघुग्रहांच्या रूपाने मानवापुढे असलेले सर्वात मोठे आव्हान अजूनही टळलेले नाही, याची आठवण या निमित्ताने करून दिली जाते.
पृथ्वीला केव्हा ना केव्हा लहान किंवा मोठा आघात सोसावा लागणार हे नक्की आहे. कदाचित आपल्या आयुष्यात असे काही होणारही नाही. पण पृथ्वीवर विनाशकारी आघात होण्याचा धोका मात्र मोठा आहे. यापासून बचाव करण्याची आपली कोणतीही तयारी नाही, हेही तितकेच खरे आहे.
- रॉल्फ डेन्सिंग, प्रमुख,
योरोपियन स्पेस आॅपरेशन्स सेंटर, जर्मनी
एक किमी किंवा त्याहून जास्त मोठ्या आकाराचे बहुसंख्य लघुग्रह शोधले गेले असल्याने आता १४० मीटरपर्यंतच्या आकाराचे लघुग्रह हुडकणे हे पुढचे उद्दिष्ट आहे. कारण एखाद्या देश किंवा खंडाएवढ्या प्रदेशाचा विनाश एवढ्या आकाराच्या उपग्रहाच्या टक्करीने होऊ शकणार आहे. पृथ्वीला धोका ठरू शकणाऱ्या त्सुनामी व भूकंप यासारख्या अन्य धोक्यांचा पूर्वअंदाज करता येत नाही. मात्र लघुग्रह आदळण्याच्या धोक्याचा आपण ढोबळपणे अंदाज करू शकतो.
- पॅट्रिक मायकेल,
खगोलभौतिकी तज्ज्ञ, सीएनआरएस रीसर्च इन्स्टिट्यूट, फ्रान्स