अफगाणिस्तानात भूकंप; पाकमध्ये सर्वाधिक हानी

By admin | Published: October 26, 2015 11:36 PM2015-10-26T23:36:54+5:302015-10-27T02:42:12+5:30

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात सोमवारी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाने अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानात जिवीत व मालमत्तेची अधिक हानी झाली

Earthquake in Afghanistan; Most Losses in Pakistan | अफगाणिस्तानात भूकंप; पाकमध्ये सर्वाधिक हानी

अफगाणिस्तानात भूकंप; पाकमध्ये सर्वाधिक हानी

Next

काबूल/इस्लामाबाद/नवी दिल्ली : अफगाणिस्तानच्या हिंदुकुश भागात सोमवारी ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाने अफगाणिस्तानपेक्षा पाकिस्तानात जिवीत व मालमत्तेची अधिक हानी झाली. अफगाणिस्तानात १२ विद्यार्थिनींसह १८ जण मृत्यूमुखी पडले, तर पाकिस्तानात मात्र १०५ लोकांचा बळी गेला असून १००० जण जखमी झाले आहेत. पाकच्या सीमावर्ती भागात मोठा विध्वंस घडून आला असून बचाव व मदतकार्यासाठी लष्कर तैैनात करण्यात आले आहे. भारताच्या उत्तरेत ३ ठार झाले. उत्तरेकडील राज्यात धक्का जाणवल्यानंतर लोक घाबरून रस्त्यावर आले. अमेरिकी भूगर्भशास्त्र विभागानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील जुर्म भागात व २१३.५ कि. मी. खोलीवर होता.
१२ विद्यार्थिनी मृत्युमुखी
अफगाणिस्तानात सोमवारी शक्तिशाली भूकंप होऊन १८ जण मृत्युमुखी पडले. मृतांत १२ शालेय विद्यार्थिनींचा समावेश आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.
शाळेत चेंगराचेंगरी होऊन १२ मुलींचा मृत्यू झाला. तखार प्रांतातील तालुक्वान येथे ही दुर्घटना घडली. भूकंपानंतर शाळेच्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी सर्व विद्यार्थी एकदम दरवाजाकडे धावल्यामुळे चेंगराचेंगरी झाली, असे तखार शिक्षण विभागाचे प्रमुख इनायत नावीद यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
चेंगराचेंगरीत बारा विद्यार्थिनी (सर्व अल्पवयीन) मृत्युमुखी पडल्या, तर इतर ३५ जण जखमी झाले. पाकिस्तान सीमेलगतच्या नांगरहार प्रांतात सहा जण मृत्युमुखी पडले, तर इतर ६९ जखमी झाले, असे स्थानिक सार्वजनिक रुग्णालयाचे प्रमुख नजीब कामवाल यांनी सांगितले. नांगरहार प्रांताच्या काही जिल्ह्यांत काही लोक ढिगाऱ्याखाली अडकून पडले आहेत.
बचावकार्यासाठी लष्कर तैनात
इस्लामाबाद : पाकिस्तानात सोमवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपात १०५ लोक मृत्युमुखी पडले, तर १००० हून अधिक जखमी झाले आहेत. प्रशासनाने भूकंपग्रस्त भागातील मदत व बचाव कार्यासाठी लष्कराला तैनात केले आहे. या धक्क्याची तीव्रता ७.५ रिश्टर स्केल एवढी तर केंद्रबिंदू शेजारील अफगाणिस्तानात होता.
तत्काळ सतर्कतेचे आदेश घोषित करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी सर्व स्त्रोतांचा वापर करावा, असे निर्देश पंतप्रधान नवाज शरीफ यांनी सर्व केंद्रीय, नागरी, लष्करी व प्रांतीक विभागांना दिले आहेत. हानीचा आढावा तसेच बचाव व मदतकार्यात केंद्रीय, नागरी, लष्करी आणि प्रांतीक विभागांत समन्वय रहावा यासाठी शरीफ यांच्या निर्देशावरून आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात आले आहे. कराची, लाहोर, क्वेट्टा, इस्लामाबाद, रावळपिंडी, पेशावर, कोहट व मलाकंद आदी प्रमुख शहरांतही भूकंपाचे हादरे जाणवले.
(वृत्तसंस्था)
भारतात तीनजण ठार, एक मिनिट जाणवला हादरा
नवी दिल्ली : दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक शहरांना सोमवारी ७.५ रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाने जबर हादरा दिला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांनाही तुलनेत अधिक शक्तिशाली भूकंपाने हादरे दिल्यानंतर प्रचंड दहशत निर्माण झाली होती. दुपारी २.४० वाजता जवळपास एक मिनिट हादरे जाणवत असताना अनेक लोक घाबरून घरे आणि कार्यालयाबाहेर पडले. काश्मिरात दोन जवान जखमी झाले, जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपामुळे घाबरलेल्या दोन महिलांचे हृदयघाताने निधन झाले तर रियासी जिल्ह्यात एक युवक मृत्युमुखी पडला. राज्यात दोन जवानांसह १० जण जखमी झाले.
दिल्ली, राजस्थान, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेशात भूकंपाचे तीव्र हादरे जाणवत होते. भूकंपामुळे दहशत निर्माण होताच दिल्लीतील मेट्रोची सेवा काही काळ स्थगित करण्यात आली.
श्रीनगर, सिमला, चंदीगड आणि जयपूरमध्ये तसेच बिहारच्या काही भागात सौम्य ते मध्यम हादरे जाणवले. श्रीनगरमधील दूरध्वनी सेवा विस्कळीत झाली.
अनेक इमारती हलताना बघून आम्हाला २००५ च्या विनाशकारी भूकंपाचे स्मरण झाले अशी प्रतिक्रिया श्रीनगरच्या रहिवाशांनी दिली आहे.पंजाबमधील अमृतसर, फगवाडा, जालंधर, पतियाळा, फरीदकोट, गुरुदासपूर, लुधियाना आणि मोहाली, हरियाणातील अंबाला, कुरुक्षेत्र, कर्नाल, पानीपत, सोनेपत, गुरगाव, रोहतक, फरिदाबाद, पंचकुला, फतेहाबाद, सिर्सा आणि भिवानी येथेही सौम्य हादऱ्यानंतर नागरिकांमध्ये दहशत पसरली होती. उत्तराखंड, मध्य प्रदेशातही हादरे जाणवले .
मदत देणार-मोदी
भूकंपाचे हादरे जाणवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानला मदतीचा हात देऊ केला आहे. भूकंपामुळे भारताचा बराच भाग प्रभावित झाला असून मी नुकसानीचा तत्काळ आढावा घेण्याचा आदेश दिला आहे. मी सर्वांच्या सुरक्षेसाठी प्रार्थना करीत आहे, असे त्यांनी टिष्ट्वटरवर म्हटले.
बंकर कोसळले
जम्मू-काश्मिरातील बारामुल्ल्या जिल्ह्णात सोपोर येथे बंकर कोसळल्यामुळे दोन लष्करी जवान जखमी झाले. गंजू हाऊस येथे जवान मुक्कामाला असताना बंकर कोसळल्यानंतर जखमी झालेल्या जवानांना लगेच रुग्णालयात हलविण्यात आले.
सुनामीचा धोका नाही...
अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताला शक्तिशाली भूकंपाचे हादरे बसले असले तरी भारतीय उपसागरांमध्ये सुनामीचा धोका नसल्याचे राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्राने(आयएनसीओआयएस) स्पष्ट केले आहे.

Web Title: Earthquake in Afghanistan; Most Losses in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.