जम्मू-काश्मीरला बसले 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2017 08:06 AM2017-09-23T08:06:30+5:302017-09-23T08:32:15+5:30

जम्मू-काश्मीरला भूकंपाचे हादरे बसले आहेत. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.5 एवढी होती

earthquake in jammu kashmir | जम्मू-काश्मीरला बसले 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे 

जम्मू-काश्मीरला बसले 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचे हादरे 

googlenewsNext

श्रीनगर, दि. 23 - जम्मू-काश्मीरला भूकंपाचे हादरे बसले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.5 रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपामुळे कोणतीही हानी झालेले नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे. दरम्यान, मेक्सिकोमध्ये 19 सप्टेंबरला झालेल्या भयावह भूकंपाने 270 हून अधिक जणांचे बळी घेतले असून, प्रचंड आर्थिक हानीही घडली आहे. या 7.1 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाच्या तडाख्याने अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या. इमारतींच्या ढिगा-यांखाली अनेक जण अडकून पडले. मेक्सिकोतील भूकंपाच्या वृत्तानं संपूर्ण जग हादरलं आहे.  

या वृत्तानंतर भारतातील नागरिकांमध्येही घबराहट पसरली आहे. कारण काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानं (NCS) असे सांगितले की, राजधानी दिल्ली आणि अन्य नऊ राज्यांच्या राजधानींसहीत देशातील 29 शहरं गंभीर आणि अत्यंक गंभीर भूकंपीय क्षेत्रात मोडतात. यात अधिकतर हिमालयातील परिसराचा समावेश आहे. 

NCSच्या अहवालानुसार,  दिल्ली, पाटणा (बिहार), श्रीनगर (जम्मू काश्मीर), कोहिमा (नगालँड), पाँडेचेरी, गुवाहाटी (आसाम), गंगटोक (सिक्कीम), शिमला (हिमाचल प्रदेश), देहराडून (उत्तराखंड), इम्फाळ (मणिपूर) आणि चंडीगड भूकंपीय क्षेत्र 4 आणि 5 अंतर्गत येतात आणि या सर्व शहरांची एकूण जनसंख्या तीन कोटींहून अधिक आहे.  

मेक्सिकोला जगभरातून मदत
मेक्सिको सिटीवर कोसळेल्या या भयंकर आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी जगभरातून मदतीसाठी हात पुढे आले असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कॅनडाच्या पंतप्रधानांनी मदत देऊ करून संकटकाळात आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचे सांगत मेक्सिको सिटीवासीयांना धीर दिला. भूकंपामुळे इमारती कोसळताना, आतच्या गॅस सिलिंडर्समुळे तसेच विजेच्या उपकरणांमुळे स्फोट झाले आणि कोसळणा-या इमारती जळतच खाली आल्या. त्या आगींमुळेही काही जण होरपळून मरण पावले. 

मेक्सिकोमध्ये १९८५ मध्ये याच दिवशी आलेल्या भयानक विध्वसंकारी भूकंप झाला होता. त्यावेळी १० हजार लोक मृत्युमुखी पडले होते. या विध्वंसक भूंकपाच्या आठवणी मेक्सिकोवासीयांच्या मनी कायम असताना मंगळवारी १९ सप्टेंबरच्या रात्री भूकंपाने मेक्सिको सिटी हादरली. मंगळवारच्या भूकंपाआधी १२ दिवसांपूर्वी दक्षिणेकडील दोन प्रांतांत आलेल्या भूकंपात १०० जण ठार, तर दोनशेहून अधिक जखमी झाले होते.

दरम्यान, मेक्सिकोतील एन्रिक रेबासमेन प्राथमिक शाळेतील दृश्य हृदय गोठवणारे होते. या शाळेच्या इमारतीचे तीन मजले डोळ्यांच्या पापण्या लवण्याच्या हात भुईसपाट झाले. त्यात २१ विद्यार्थी मरण पावले. याशिवाय मेक्सिकोतील अनेक इमारती पत्त्याच्या बंगल्यासारख्या काही क्षणातच कोसळल्या.  मेक्सिको सिटीबरोबरच प्युएब्ला, मॉरेलॉस, मेक्सिको स्टेट आणि गुएर्रेरो येथे जीवितहानी झाली. अचानक इमारती हादरू लागल्याने अनेकांनी जीव मुठीत धरून मोकळ्या सुरक्षित जागी धाव घेतली. 


गेल्या 30 वर्षात जगाला हादरवणारे शक्तीशाली भूकंप

20 ऑगस्ट 1988- नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात 721 लोकांचे प्राण गेले तसेच भारतातील बिहार राज्यात या भूकंपामुळे 277 लोक मृत्युमुखी पडले.

20 ऑक्टोबर 1991- उत्तर प्रदेशात 6.6 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 768 लोक मृत्युमुखी पडले.

30 सप्टेंबर 1993- किल्लारी येथे 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाने मोठी हानी. 9 हजारांहून अधिक लोकांचे प्राण गेले. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे मोठे आर्थिक नुकसानही झाले.

26 जानेवारी 2001- गुजरातमध्ये झालेल्या 7.7 रिश्टर तीव्रतेच्या मोठ्या भूकंपामुळे 20 हजार लोकांचे प्राण गेले व दीड लाखांहून अधिक लोक जखमी झाले. भारताच्या अलिकडच्या इतिहासातील सर्वात विनाशकारी भूकंप समजला जातो.

26 डिसेंबर 2003- इराणमधील बाम येथे झालेल्या 607 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपात 31,884 लोक मृत्युमुखी पडले आणि 18 हजार लोक जखमी झाले.

26 डिसेंबर 2004- सुमात्रा येथे आलेल्या 9.3 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे हिंदी महासागरामध्ये त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामुळे विविध देशांमधील 2,20,000 लोकांचे प्राण गेले त्यामध्ये 1 लाख 68 हजार लोक इंडोनेशियाचे होते.

28 मार्च 2005- इंडोनेशियातील नियास बेटेवरील भूकंपात 900 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑक्टोबर 2005- पाकिस्तानमध्ये 7.6 रिश्टर स्केल भूकंपामुळे 75 हजार लोकांचे प्राण गेले. या भूकंपामुळे 35 लाख लोकांना आपली घरेदारे सोडावी लागली.

27 मे 2006 - इंडोनेशियातील योगकार्ता येथे झालेल्या मोठ्या भूकंपामुळे 6 हजार लोकांचे प्राण गेले तर दीड लाख लोकांना आपली घरे गमवावी लागली.

12 मे 2008- चीनमधील सिचुआन प्रांतात 8 रिश्टर तीव्रतेच्या भूरंपामुळे 87 हजार लोकांचे प्राण गेले तर अनेक लोक बेपत्ता झाले.

14 एप्रिल 2010- चीनच्या वायव्येकडील क्वींन्घाई प्रांतात 6.9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 3 हजार लोकांचे प्राण गेले.

12 जानेवारी 2010- 7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याने हैतीमधील जनजीवन विस्कळीत. अडिच ते तीन लाख लोक मृत्युमुखी पडले.

23 ऑक्टोबर 2011- तुर्कस्थानात 7.2 रिश्टर तीव्रतेचा भूकंप आल्यामुऴे 600 लोक मृत्युमुखी पडले तर 4150 लोक जखमी झाले.

11 मार्च 2011- जपानच्या किनाऱ्यावर आलेल्या 9 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. यामध्ये 18,900 लोकांचे प्राण गेले तसेच दाईची येथील अणूप्रकल्पास धोका निर्माण झाला.

11 ऑगस्ट 2012- इराणमधील तेबरिझ येथे 6.3 आणि 6.4 अशा तीव्रतेचे सलग दोन भूकंप झाले. यामध्ये 306 लोक मृत्यू पावले तर 3000 लोक जखमी झाले.

25 एप्रिल 2015- नेपाळमध्ये 7.8 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 8,900 लोक मृत्युमुखी पडले तसेच पाच लाख लोकांना आपल्या घरादारास मुकावे लागले.

26 ऑक्टोबर 2015- अफगाणिस्तानातील हिंदुकुश प्रांतामध्ये 7.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. याचे धक्के भारतीय उपखंडात दूरवर जाणवले.

फेब्रुवारी 2016- तैवानच्या तैनान येथे झालेल्या 6.4 तीव्रतेच्या भूकंपात 100 लोक मृत्युमुखी पडले.

16 एप्रिल 2016- इक्वेडोर येथे 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे 673 लोकांचे प्राण गेले तसेच इमारती कोसळून मोठे नुकसान झाले.

24 ऑगस्ट 2016- इटलीमध्ये 6.2 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 300 लोक मृत्युमुखी पडले.

8 ऑगस्ट 2017-चीनच्या वायव्य प्रांतातील भूकंपामुळे 24 लोकांचे प्राण गेले.

Web Title: earthquake in jammu kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.