ईशान्य भारतात भूकंप
By admin | Published: January 5, 2016 03:28 AM2016-01-05T03:28:01+5:302016-01-05T03:28:01+5:30
सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने ईशान्य भारत हादरला. त्यात ९ ठार तर १०० जण जखमी झाले. ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे
इम्फाळ/गुवाहाटी : सोमवारी पहाटे शक्तिशाली भूकंपाने ईशान्य भारत हादरला. त्यात ९ ठार तर १०० जण जखमी झाले. ६.८ रिश्टर स्केल तीव्रतेच्या या भूकंपामुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून, असंख्य इमारतींचे नुकसान झाले आहे. लष्कर आणि हवाईदलाने युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू केले असून, राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथकेही भूकंपग्रस्त भागात दाखल झाली आहेत.
पहाटे ४ वाजून ३५ मिनिटांनी आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू मणिपूरच्या तमेंगलोंग जिल्ह्यात होता आणि त्याचे धक्के आसाम, पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, बिहार व झारखंडमध्येही जाणवले. अलीकडील काही वर्षांत आलेल्या सर्वाधिक तीव्र भूकंपांपैकी हा एक होता. मणिपूरमध्ये ज्या सात लोकांचा मृत्यू झाला त्यात ११वर्षीय मुलीचाही समावेश आहे. बिहारमध्ये एका व्यक्तीचा भूकंपाच्या भीतीने मृत्यू झाला. गुवाहाटी आणि आसामच्या इतर काही भागांत भूकंपामुळे किमान २० लोक जखमी झाले; तर ३० इमारतींना तडे गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नैसर्गिक आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या लोकांबद्दल दु:ख व्यक्त करताना आपण गृहमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा केली असून, भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांना केल्याचे सांगितले.