भूकंपाने हिमालय हादरला

By Admin | Published: April 26, 2015 02:32 AM2015-04-26T02:32:25+5:302015-04-26T02:32:25+5:30

नेपाळमध्ये शनिवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी सुमारे ५,००० नागरिक मृत्युमुखी पडले. या भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळला लागून असलेल्या भारताच्या राज्यांनाही बसले.

Earthquake shook the Himalayas | भूकंपाने हिमालय हादरला

भूकंपाने हिमालय हादरला

googlenewsNext

दिल्ल्लीने पाठविली तातडीने मदत : राज्यातील पर्यटक सुखरूप
नेपाळमध्ये शनिवारी भूकंपाच्या तीव्र धक्क्यांनी सुमारे ५,००० नागरिक मृत्युमुखी पडले. या भूकंपाचे धक्के हिमालयाच्या पायथ्याशी नेपाळला लागून असलेल्या भारताच्या राज्यांनाही बसले. त्यात बिहारमध्ये ३८, उत्तर प्रदेशात ११ तर पश्चिम बंगालमध्ये दोन जण दगावले़ यात २३७ जण जखमी होऊन शेकडो घरांची पडझड झाली. या भूकंपाने एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखरावर प्रचंड प्रमाणावर हिमस्खलन होऊन एव्हरेस्ट चढाईच्या तयारीत असलेले बेस कॅम्पवरील विविध देशांतील १८ गिर्यारोहकही ठार झाले. हिमालयाच्या पलीकडे असलेल्या तिबेटमध्येही या भूकंपाने पाच बळी घेतले.
रिश्टर स्केलवर ७.९ एवढी तीव्रता नोंदली गेलेल्या पहिल्या भूकंपाच्या धक्क्याचा केंद्रबिंदू काठमांडूच्या पश्चिमेस गोरखा जिल्ह्यात भूपृष्ठाच्या खाली १५ किमीवर होता. नेपाळमध्ये गेल्या ८० वर्षांत झालेला हा सर्वात भीषण भूकंप होता. त्यानंतर ४० मिनिटांनी गोरखा व रसुवा जिल्ह्यामध्ये अनुक्रमे ६.६ व ५.८ रिश्टरचे धक्के बसले. त्यापुढील अडीच तासांत किमान ५ रिश्टरचे आणखी १० भूकंपाचे धक्के जाणवले. काठमांडू ही राजधानी आणि तिला लागून असलेल्या ललितपूर व भक्तपूर या जोडशहरांसह इतर शहरांमध्ये हजारो इमारतींची पडझड झाली.
रात्री काळोख पडेपर्यंत ढिगाऱ्यांखालून हजारो मृतदेह बाहेर काढले होते. मृतांचा आकडा आणखी बराच वाढेल, अशी भीती सरकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. नेपाळच्या एकूण ७५ पैकी २९ जिल्ह्यांमध्ये भूकंपाने हानी
झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. काठमांडू शहरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला शंभर वर्षांहून जूना धरहरा टॉवर व दरबार चौकातील जुन्या राजेशाही वास्तू पूर्णपणे उद््ध्वस्त झाल्या. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पशुपतीनाथ मंहिराचीही थोडीफार पडझड झाली. पुरातन स्वयंभूनाथ स्तूप मात्र या विनाशातून सुदैवाने बचावला. नेपाळमधील या विनाशकारी नैसर्गिक आपत्तीनंतर लगेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन भारताकडून नेपाळला शक्य ती सर्व मदत तातडीने देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या दहा तुकड्या नेपाळकडे व पाच तुकड्या उत्तर प्रदेश व बिहारकडे लगेच रवाना झाल्या. भारतीय वायुदलाने भूकंपग्रस्त काठमांडूत अडकलेल्या ५५ भारतीयांना सुखरुप भारतात आणले. यात चार लहान बालकांचा समावेश आहे. सी-१३० जे हे विमान तातडीने एनडीआरएफचे एक पथक आणि मदत साहित्य घेऊन काठमांडूत दाखल झाले होते. हे विमान शनिवारी रात्री १०.४५ वाजता दिल्लीत ५५ भारतीयांना घेऊन पोहोचले. पंतप्रधान मोदी व राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी नेपाळच्या नेत्यांशी संपर्क ठेवून हरतऱ्हेच्या मदतीची त्यांना ग्वाही दिली. जीवितहानी झालेल्या बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्येही युद्ध पातळीवर बचाव व मदत कार्य हाती घेण्यात आले. केंद्र सरकारने या राज्यांनाही हरतऱ्हेची मदत देऊ केली असून आपत्ती निवारण दलाखेरीज लष्करी तुकड्याही तेथे रवाना झाल्या. प्राणहानी वा पडझड झाली नसली तरी या भूकंपाचे धक्के दिल्ली, राजस्थान, मध्य प्रदेश, सिक्किम व महाराष्ट्र या दूरवरच्या राज्यांमध्येही जाणवले. अनेक ठिकाणी लोक घाबरून घरांतून बाहेर पडून रस्त्यांवर आले. (लोकमत न्यूज नेटवर्क, वृत्तसंस्था)

काठमांडू येथील भारतीय दूतावासाच्या आवारातील इमारत कोसळून मदन नावाच्या कर्मचाऱ्याची मुलगी ठार झाली; तर पत्नी गंभीर जखमी असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी टिष्ट्वटरवर दिली.

Web Title: Earthquake shook the Himalayas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.