भूकंपामुळे नेपाळमधून पलायनाचा धोका वाढणार!
By Admin | Published: May 1, 2015 10:44 PM2015-05-01T22:44:16+5:302015-05-01T22:44:16+5:30
रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने
डेहराडून : रोजगार आणि चांगल्या जीवनशैलीच्या आकर्षणाने गेल्या अनेक शतकांपासून नेपाळमधील लोक भारतात येत आहेत. परंतु २५ एप्रिलच्या विनाशकारी भूकंपाने झालेल्या विध्वंसामुळे हिमालयाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून लोकांचे वेगाने पलायन होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नेपाळी अर्थव्यवस्थेचा कणा मानल्या जाणाऱ्या पर्यटन व्यवसायाचे अतोनात नुकसान झाल्यानंतर काठमांडूसह नेपाळच्या विविध भागातून लोकांचे स्थलांतरण सुरू झाले आहे. लोकांचा हा लोंढा कुठल्या दिशेने जात आहे हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी भारतातील आणि विशेषत: नेपाळला लागून असलेल्या उत्तराखंडमध्ये गुप्तचर संस्थांना याबाबत सतर्क करण्यात आले आहे. राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (गुप्तचर) अशोककुमार यांना यासंदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले, आम्ही भारत-नेपाळ सीमेवर गुप्तचर यंत्रणेला सतर्क केले आहे. भारत आणि नेपाळदरम्यान उत्तराखंडमध्ये सुमारे २७५ किमी लांब सीमारेषा आहे. तूर्तास भारत सरकारने नियम श्थििल करून सीमेवरून लोकांना कुठल्याही पक्षपाताशिवाय देशात प्रवेशाची परवानगी दिली आहे.
भूकंपाची आपत्ती लक्षात घेऊन माणुसकीच्या भावनेतून कुठलेही नागरिकत्व असलेल्या व्यक्तीस नेपाळच्या सीमेतून भारतात येऊ देण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. प्राथमिक अंदाजानुसार भूकंपामुळे नेपाळमधील अर्थव्यवस्थेचे अब्जावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.
भारत आणि नेपाळी जनतेमध्ये दृढ असे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंध आहेत. त्यामुळे नेपाळमधून पलायन करणारे लोक उत्तराखंड आणि सिक्किमच्या मार्गे भारतात येण्याची शक्यता असल्याचे गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे. (वृत्तसंस्था)