सिगारेट प्या, नाहीतर इ-सिगारेट? तुमच्या शरीराचं ‘खोकडं’ होणारच.
By admin | Published: June 14, 2017 06:22 PM2017-06-14T18:22:19+5:302017-06-14T18:22:19+5:30
- सिगारेट पिणाऱ्यांनो, लक्षात ठेवा, इ-सिगारेटही तेवढीच घातक.
- मयूर पठाडे
सिगारेट सोडायचा आतापर्यंत तुम्ही किती वेळा प्रयत्न केला? - अगणित वेळा केला असेल. पण ती काही सुटत नाही असाच अनुभव तुम्हाला आला असेल. पण ही सवय सुटावी म्हणून त्याच्या पर्यायांचाही शोध तुम्ही घेतला असेल. काही वर्षांपूर्वी अशीच एक इ-सिगारेट बाजारात आली होती. इ-सिगारेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक सिगारेट. ही सिगारेट आरोग्याला हानीकारक नाही किंवा कमी हानीकारक आहे म्हणून तिचा खूप मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला. पण खरंच ती तशी आहे?
इ-सिगारेट म्हणजे खरं तर एक इलेक्ट्रॉनिक उपकरण. त्यात प्रॉपेलिन ग्लायकॉल, ग्लिसरीन आणि निकोटिन यांचं लिक्विड असतं. अर्थात प्रत्येक इ-सिगारेटमध्ये निकोटिन असतंच असं नाही, पण या इ-सिगारेटमधील लिक्विड तापल्यानंतर त्यातून धूर निघतो आणि नेहमीच्या सिगारेटसारखाच धूर त्यातून निघतो. तो तुम्हाला घशात घेताही येतो आणि सोडताही येतो.
यासंदर्भात कनेक्टिकट युनिव्हर्सिटीत नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनाचा निष्कर्ष आश्चर्यकारक आहे. त्यांचं म्हणणं आहे, रेग्युलर सिगारेट आरोग्याला जितकी हानीकारक आहे, तितकीच हानीकारक ही इ-सिगारेटही आहे. अर्थात हा त्यांचा अंदाज आहे, पण तो बरोबर आहे, असावा असाही त्यांना विश्वास आहे, पण हे संशोधक ठामपणे त्याबाबत काही सांगत नाहीत, कारण हे संशोधन त्यांनी प्रत्यक्ष मानवावर केलेलं नाही.
या संशोधकांनी काय केलं?
रेग्युलर सिगारेटमुळे यकृताची, शरीराची जी हानी होते, साधारण तशीच आणि तेवढीच हानी इ-सिगारेटनंही होते असं संशोधकांना या प्रयोगात आढळून आलं.
इ-सिगारेटमुळेही कॅन्सरचा तेवढाच धोका आहे हेही त्यांना दिसून आलं.
मात्र हे संशोधन कितीही ‘खात्री’चं असलं आणि योग्य ती सारी काळजी घेऊन करण्यात आलेलं असलं तरी ते प्रयोगशाळेत केलेलं असल्यामुळे आणि माणसांवर त्याची प्रत्यक्ष चाचणी केलेली नसल्यामुळे त्याचे ठामठोक निष्कर्ष त्यांनी जाहीर केलेले नाहीत. मात्र इ-सिगारेटवाल्यांनाही ‘काळजी घ्या’ म्हणून धोक्याचा इशारा त्यांनी नक्कीच दिला आहे.