भारतात आढळला इबोलाचा पहिला रुग्ण
By admin | Published: November 19, 2014 09:11 AM2014-11-19T09:11:41+5:302014-11-19T09:12:00+5:30
लायबेरियाहून भारतात आलेल्या भारतीय तरुणाच्या (२६) इबोलाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावरील विशेष जागेत वेगळे ठेवले आहे.
नवी दिल्ली : लायबेरियाहून भारतात आलेल्या भारतीय तरुणाच्या (२६) इबोलाच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला दिल्ली विमानतळावरील विशेष जागेत वेगळे ठेवले आहे. इबोलाचा देशातील हा पहिलाच निश्चित झालेला रुग्ण आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार हा तरुण १० नोव्हेंबर रोजी येथे आला. लायबेरियात त्याच्यावर आधीच उपचार केले होते आणि नंतरच्या तपासणीत त्याच्यात कोणतीही लक्षणे दिसली नव्हती; परंतु त्याच्या वीर्याची येथील तपासणी पॉझिटिव्ह आल्यानंतर अधिकाऱ्यांनी तातडीने त्याला स्वतंत्र जागी ठेवले.
इबोलाचा रुग्ण बरा होताना त्याच्या शरीराच्या स्रावातून विषाणू बाहेर टाकले जातात. तथापि, या तरुणाच्या वीर्याच्या नमुन्यात आढळलेले विषाणू वैद्यकीयदृष्ट्या तो बरा झाला तरी लैंगिक संबंधाद्वारे ९० दिवसांपर्यंत इबोलाची लागण करू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.
या तरुणाच्या शरीराच्या स्रावाच्या तपासण्या निगेटिव्ह येईपर्यंत त्याला दिल्ली एअरपोर्ट हेल्थ आॅर्गनायझेशनच्या विशेष आरोग्य केंद्रात वेगळे ठेवले जाईल आणि तो वैद्यकीयदृष्ट्या फिट आढळला, तरच त्याला घरी जायची परवानगी दिली जाईल. हा रुग्ण इबोलाचा म्हणूनच त्याच्यावर उपचार केले जात आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. हा रुग्ण इबोलामुक्त झाला असल्याचे लायबेरियन सरकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र त्याच्याकडे असल्याचे निवेदनात म्हटले आहे.