सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा अखेर मुहूर्त ठरला; उदयनराजे भोसलेंना मोठा दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2019 10:12 AM2019-09-24T10:12:23+5:302019-09-24T10:15:15+5:30
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महा जनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते
नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले उदयनराजे भोसले यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणूक 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा लोकसभा जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. तसेच 24 ऑक्टोबरला या जागेसाठी मतमोजणी होणार असल्याने उदयनराजेंना दिलासा मिळाला आहे.
मात्र मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर केला. त्यावेळी सातारा लोकसभा पोटनिवडणुकीबाबत भाष्य केलं नव्हतं. त्यामुळे पडद्यामागून काही हालचाली झाल्या का? याची चर्चा आता सुरु झाली आहे. मात्र 21 ऑक्टोबर ही पोटनिवडणूक होणार असल्याने साताऱ्याचा खासदार दिवाळीपूर्वी ठरणार हे निश्चित झालं आहे.
राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार उदयनराजे भोसले यांनी काही अटी शर्ती टाकून भाजपमध्ये प्रवेश केला आहे याआधी त्यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. या अटी व शर्ती मध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे पोट निवडणूक ही विधानसभा निवडणूक की सोबतच व्हावी अशी अटही त्यांनी घातली होती.
साताऱ्यात नुकत्याच पार पडलेल्या महा जनादेश यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही लोकसभा निवडणूक ही विधानसभेचे सोबतच होईल असे संकेत दिले होते मात्र निवडणूक आयोगाने विधानसभा मतदारसंघाचा कार्यक्रम जाहीर करताना लोकसभेच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलं होतं.
विधानसभा निवडणुकीसोबत होणाऱ्या सातारा लोकसभा पोटनिवडणूक ही भाजपासाठी महत्वाची ठरणार आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांचे नाव आघाडीवर आहे. सातारा पोटनिवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विधानसभा निवडणुकीसोबत सातारा पोटनिवडणूक घेतल्यास उदयनराजेंविरोधी जनमताचा फटका भाजपाला बसेल अशी भीती भाजपा पदाधिकाऱ्यांच्या मनात होती. तर विधानसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणूक झाल्यास भाजपा पक्षांतर्गत राजकारणामुळे मतदारसंघातून पराभव होईल असं उदयनराजेंना वाटत होतं.