मतदानाच्या 48 तास आधी जाहीरनामा प्रसिद्धीस मज्जाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2019 10:07 AM2019-03-17T10:07:46+5:302019-03-17T11:21:25+5:30
निवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये असे शनिवारी (16 मार्च) स्पष्ट केले आहे.
नवी दिल्ली - निवडणूक आयोगाने मतदानाच्या 48 तास आधी पक्षांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करू नये असे शनिवारी (16 मार्च) स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने आता जाहीरनामा प्रसिद्ध करणे हा आचारसंहितेचाच एक भाग केला आहे. एका किंवा अनेक टप्प्यांमध्ये निवडणूक होणार असल्यास जाहीरनामा प्रतिबंधात्मक कालावधीत प्रसिद्ध करू नये, असे सुधारित आचारसंहितेमध्ये म्हटले आहे.
कोणत्याही टप्प्यात निवडणूक असली, तरी त्याच्या आधी 48 तास राजकीय पक्षांनी जाहीरनामे सादर करू नयेत, अशा अर्थाचं एक पत्र सर्व पक्षांना निवडणूक आयोगाने पाठवलं आहे. पूर्वीच्याच नियमाचा हा भाग असल्याचं स्पष्ट करत आयोगाने जाहीरनामे प्रचाराचा काळ संपल्यानंतर जाहीर करू नयेत, असं सांगितलं आहे. हा आचारसंहितेचाच एक भाग आहे. जाहीरनामा प्रसिद्ध करण्याच्या वेळेबाबत आतापर्यंत कोणताही नियम नव्हता. मात्र गेल्या निवडणुकीत भाजपाने पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. त्यामुळे काँग्रेसने तेव्हा तक्रारही केली होती.
Election Commission of India has fixed a timeline for the release of manifesto by political parties. Manifestos for both single and multi phase elections shall not be released during prohibitory period, as prescribed under Section 126 of the Representation of the People Act, 1951 pic.twitter.com/Cn9DCwFr8Z
— ANI (@ANI) March 16, 2019
इव्हीएमबाबत निवडणूक आयोगाने घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय
गेल्या काही निवडणुकांपासून इव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने इव्हीएमबाबत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. व्हीव्हीपॅट मशीनचा सार्वत्रिक वापर करण्यात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. तसेच इव्हीएमसोबत छेडछाड होऊ नये यासाठी प्रत्येक इव्हीएमवर जीपीएसद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. तसेच यावेळी इव्हीएम मशीनवर उमेदवाराचे छायाचित्रही लावण्यात येणार आहे.
भारतीय जवानांचे फोटो प्रचारात वापरू नका; निवडणूक आयोगाची सक्त ताकीद
कोणत्याही राजकीय पक्षांनी संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारामध्ये न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने दिली आहे. शनिवारी (9 मार्च) निवडणूक आयोगाची एक बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये प्रचारादरम्यान सैन्याचा वापर करू नका अशी ताकीद निवडणूक आयोगाने देशातील विविध राजकीय पक्षांना दिली. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केले होते.
संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रे विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान वापरले जात असल्याबाबतची माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले होते. तसेच सशस्त्र दल देशाच्या सीमा, राजकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावत असतात.त्यामुळे सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही आयोगाने नमूद केले होते.
केंद्रीय निवडणूक आयोगाने 17 व्या लोकसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार देशात सात टप्प्यात मतदान होणार आहे. 11 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीचा पहिला तर 19 मे रोजी सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. तर 23 मे रोजी मतमोजणी होईल.