तेज बहादूर उमेदवारी रद्द प्रकरण: निवडणूक आयोग सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 08:55 AM2019-05-09T08:55:28+5:302019-05-09T08:56:16+5:30
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेले बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल केल्याने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे
नवी दिल्ली - वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी उमेदवारी अर्ज भरलेले बीएसएफचे बडतर्फ जवान तेज बहादूर यांचा उमेदवारी अर्ज रद्दबातल केल्याने सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे. तेज बहादूर यांनी उमेदवारी अर्ज रद्द केल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. बुधवारी न्यायालयाने निवडणूक आयोगाला याचिकेच्या आधारे आपलं म्हणणं मांडण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोग आपली बाजू मांडणार आहे.
वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी पुन्हा निवडणुकीसाठी उभे आहेत. त्यांच्याविरोधात तेज बहादूर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. बुधवारी न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये मुख्य सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्यायमुर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले. तेज बहादुर यांच्यावतीने वकील प्रशांत भूषण यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.
समाजवादी पार्टीकडून तेज बहादूर वाराणसी लोकसभा मतदारासंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र निवडणूक आयोगाकडून तेज बहादूर यांचा अर्ज रद्द करण्यात आला आहे. आपला अर्ज रद्द केल्यान सत्ताधारी पक्षाला या मतदारसंघात फायदा होईल त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपातीपणाचा आहे असा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे.
वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यासमोर आव्हान उभे करण्यासाठी सपा-बसपा महाआघाडीने मोठी खेळी खेळली होती. सपा-बसपा महाआघाडीने वाराणसी येथील आपला उमेदवार बदलताना बडतर्फ बीएसएफ जवान तेज बहादूर यांना उमेदवारी जाहीर केली. तेज बहादूर आणि आणि आधीच्या उमेदवार शालिनी यादव यांनी समाजवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, नरेंद्र मोदींसमोर तेज बहादूर हेच उमेदवार असतील. तसेच शालिनी यादव या उमेदवारी अर्ज मागे घेतील, असे समाजवादी पक्षाने स्पष्ट केले होते. या मतदारसंघात काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी तेज बहाद्दूर यांचा अर्ज रद्द केला. आता शालिनी यादव सपाकडून मोदींविरोधात उभ्या राहणार आहेत. त्यावेळी तेज बहाद्दूर समर्थक आणि पोलिसांदरम्यान जोरदार वादावादी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी समर्थकांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून बाहेर काढले होते.