आता मतदान प्रक्रियेत होणार बदल; केंद्रीय निवडणुक आयोगाने घेतला मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 08:34 PM2020-07-02T20:34:29+5:302020-07-02T20:37:20+5:30
कोरोनाचा सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना आहे.
नवी दिल्ली: संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६, ०१, ९५२ वर पोहचली आहे. यापैकी ३,५७,६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७, ७८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
कोरोनाचा सर्वात जास्त धोका लहान मुलं आणि वयोवृद्ध लोकांना आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल जाहीर केला आहे. 65 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींना पोस्टल मतदानाचा अधिकार आयोगाने दिला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर वृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय आवश्यक असल्याचं निवडणूक आयोगाचे मत आहे. याआधी पोस्टल मतदानासाठी 80 ही वयोमर्यादा होती. मात्र केंद्रीय निवडणुक आयोगाच्या या निर्णयामुळे आता मतदान प्रक्रियेत बदल दिसून येणार आहे.
केंद्रीय निवडणुक आयोगाने या निर्णयसोबतच कोरोनाग्रस्त आणि कोरोनामुळे होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींना देखील पोस्टल मतदान करण्याचा अधिकार दिला आहे. या वर्षाच्या अखेरीच बिहारच्या निवडणुका अपेक्षित असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाने आज अधिकृत नोटिफिकेशन काढून या निर्णयावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.
दरम्यान, अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यापासून देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून, गेले पाच दिवस त्यांच्यात किमान १८ हजारांनी भर पडत आहे. तीन जूनला कोरोना रुग्णांची संख्या दोन लाखांवर होती. कोरोना रुग्णांची तीन लाख संख्या होण्यासाठी फक्त १० दिवस लागले तर चार लाख होण्यासाठी ८ दिवस लागले. त्यानंतर आता गेल्या पाच दिवसांत कोरोनाचे एक लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबते वृत्त दिले आहे.
देशात कोरोनाचा सामूहिक संसर्ग सुरू झालेला नाही या आपल्या मतावर केंद्र सरकार अद्यापही ठाम आहे. १,७४,००० पेक्षा अधिक रुग्ण महाराष्ट्रात आहे. इतर राज्यांपैकी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आतापर्यंत ७८५० पेक्षा जास्त जणांचा बळी गेला आहे. 90 हजारांहून अधिक रुग्ण तामिळनाडूमध्ये आहे. सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांत तामिळनाडूचा दुसरा क्रमांक लागतो. 87 हजारांहून जास्त कोरोनाचे रुग्ण दिल्लीमध्ये आहेत. 32 हजारांहून अधिक गुजरातमध्ये आहे, तर उत्तर प्रदेशमध्ये २३ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत.