बिहारात रालोआला बंडखोरीचे ग्रहण
By admin | Published: September 17, 2015 01:11 AM2015-09-17T01:11:56+5:302015-09-17T01:11:56+5:30
रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट
पाटणा : रामविलास पासवान यांच्या लोकजनशक्ती पक्षाचे (लोजपा) खासदार रामकिशोरसिंग यांनी बुधवारी पक्ष सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला असतानाच तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेल्या भाजपच्या दोन आमदारांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेतल्याने बिहारमध्ये रालोआला जबर हादरा बसला आहे.
वैशाली लोकसभा मतदारसंघाचे खासदार रामकिशोरसिंग यांनी लोजपाच्या सरचिटणीस आणि संसदीय पक्षाच्या मुख्य प्रतोदपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. त्यांनी राजस्थानमधील प्रभारी सरचिटणीसपदाचा पदभारही सोडला. ते दीर्घकाळापासून पासवानांचे निकटस्थ राहिले आहेत. रालोआसोबत जागावाटप करताना निर्णय प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने ते नाराज होते. रामकिशोरसिंग यांची नाराजी दूर केली जाईल, असे संसदीय पक्षाचे प्रमुख चिराग पासवान यांनी अलीकडेच म्हटले होते; मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्यामुळे त्यांनी सर्व पदाचा राजीनामा देण्याचे पाऊल उचलले. रामकिशोरसिंग यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंग यांचा धक्कादायक पराभव केला होता. (वृत्तसंस्था)
भाजपच्या दोन आमदारांचा बंडाचा झेंडा
- तिकीट नाकारल्यामुळे नाराज झालेले भाजपचे दोन आमदार अमनकुमार आणि अजय मंडल यांनी बुधवारी दुपारी मुख्यमंत्री नितीशकुमार यांची भेट घेत धर्मनिरपेक्ष आघाडीत सहभागी होण्याचे संकेत दिले आहेत. मला तिकीट नाकारण्यात आल्यामुळे नितीशकुमार यांनीही आश्चर्य व्यक्त केल्याचे भागलपूर जिल्ह्यातील पीरपैनती (राखीव) मतदारसंघाचे आमदार अमनकुमार यांनी पत्रकारांना सांगितले. अजय मंडल हे त्याच जिल्ह्यातील नाथनगर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.