दोनदा तपासणी केलेल्या ईव्हीएम, हेच विरोधकांना निवडणूक आयोगाचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:20 AM2019-09-22T02:20:50+5:302019-09-22T06:36:11+5:30
विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणारे संभाव्य प्रश्न व आरोपांचा निपटारा करण्याची तयारीही सुरू केली आहे.
- संतोष ठाकूर
नवी दिल्ली : विरोधी पक्षांकडून ईव्हीएमबाबत उपस्थित करण्यात येणारे संभाव्य प्रश्न व आरोपांचा निपटारा करण्याची तयारीही सुरू केली आहे. दोनदा तपासणी केलेले ईव्हीएम मतदानासाठी लावण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
पहिल्या टप्प्यातील तपासणीमध्ये निवडणूक आयोग आपल्यातर्फे सर्व ईव्हीएमची तपासणी करील. अचानक कोणतीही मशीन निवडून अभियंते व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर संबंधित मशीनवर मतदान तपासले जाते. जे बटन दाबले जात आहे, ते योग्य पद्धतीने काम करीत आहे की नाही, हे पाहिले जाते. दुसऱ्या तपासणीच्या वेळी निवडणूक आयोग सर्व पक्षांच्या नेत्यांना आमंत्रित करून मतदान यंत्रांची तपासणी करणार आहे. ते त्यांच्यासमवेत कोणत्याही अभियंत्याला किंवा ईव्हीएमच्या तज्ज्ञाला नेऊ शकतात. तेथे ते त्यांच्या शंका उपस्थित करून कोणतीही मशीन अचानकपणे तपासणी करू शकतात.
मतदान केंद्रावरही चाचणी
महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांतील कोणीही व्यक्ती, कोणत्याही पक्षाशी संबंधित कार्यकर्ता किंवा कोणीही सामाजिक कार्यकर्ता आपली शंका उपस्थित करून तपासणीसाठी अर्ज करू शकतात. एवढेच नव्हे तर मतदान यंत्रे जेव्हा मतदान केंद्रांवर तैनात केली जातील, त्यावेळीही तेथे असलेले विविध पक्षांचे बुथ कार्यकर्ते किंवा निवडणूक एजंट यांच्यासमोर मशीनवर मतदान सुरू करण्यापूर्वी चाचणी घेऊन दाखवली जाते. त्यानंतर मात्र एखाद्या ईव्हीएमबाबत काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोग काही करू शकत नाही.