सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी - प्रियांका
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 05:13 AM2019-09-04T05:13:30+5:302019-09-04T05:13:33+5:30
त्यांनी सांगितले की, देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहातो आहे.
नवी दिल्ली : मोदी सरकारच्या वाईट कामगिरीमुळे देशात आर्थिक मंदी आली आहे अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी केली आहे. ऐतिहासिक स्वरुपाची मंदी आल्याचे सरकारने कबुल करावे असेही त्यांनी म्हटले आहे.
त्यांनी सांगितले की, देशात मंदी आल्याचे व तिचा सामना करण्यासाठी सरकार उपाययोजना करत असल्याचे प्रत्येक जण पाहातो आहे. मात्र तरीही मोदी सरकार खरी वस्तुस्थिती सांगण्यास तयार नाही. प्रसारमाध्यमांद्वारे खोटे चित्र रंगवून सरकारला सत्य फार काळ झाकता येणार नाही. शेकडो वेळा खोटे बोलले की ती गोष्ट कालांतराने लोकांना खरी वाटायला लागते असे प्रत्येक वेळेस होत नाही.
जून महिन्याअखेर संपलेल्या तिमाहीत देशाचा जीडीपी विकासदर ५ टक्क्यांपर्यंत खाली घसरला. या दरात गेल्या सहा वर्षांत इतकी घसरण कधीही झाली नव्हती. देशामधील वाहननिर्मिती क्षेत्राला मंदीचा मोठा फटका बसला आहे.