आर्थिक वृद्धिदर घसरला; गाठला सहा वर्षांचा नीचांक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 06:10 AM2019-08-31T06:10:48+5:302019-08-31T06:11:12+5:30
मॅन्युफॅक्चरिंग, बांधकाम, सेवा, कृषी क्षेत्रातील मंदीचा परिणाम
नवी दिल्ली : आधीच मंदीच्या माऱ्याने रुतण्याच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती आणखी मंदावली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मंदी, कृषी क्षेत्रात झालेली घट, यामुळे भारताचा सकल राष्टÑीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या नीचांकापर्यंत खाली उतरला असून, तो ५ टक्के झाला आहे.
यापूर्वी २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४.९ टक्के एवढा कमी वृद्धिदर नोंदविला गेला होता. २०१८-१९ मध्ये याच तिमाहीत तो ८ टक्के एवढ्या उच्च स्तरावर गेला होता. यावर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो ५.८ टक्के होता.
२०१९-२० मध्ये जीडीपीचा वृद्धीदर ७ टक्क्यांऐवजी ६.९ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील जून महिन्यात व्यक्त केला होता, तसेच एकूण मागणी वाढवून विकासाबाबतची चिंता दूर करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला होता. रिझर्व्ह बँकेने पहिल्या सहामाहीत जीडीपी वृद्धीदर ५.८ ते ६.६ टक्क्यांच्या दरम्यान व दुसºया सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे.
चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६.२ टक्के होता. मागील २७ वर्षांतील तो सर्वांत कमी राहिला.
हा तर मोदीनिर्मित अर्थकंप : कॉंग्रेसचे टीकास्त्र
जीडीपीचा वृद्धी दर नीचाकांवर जाणे हा मोदीनिर्मित अर्थकंप असून, देशात आर्थिक आणीबाणी जाहीर करावी, अशी मागणी कॉंग्रेसने केली आहे. सत्य दीर्घ काळपर्यंत झाकले जाऊ शकत नाही. अर्थव्यवस्थेची ही दशा जागतिक घटकांमुळे झालेली नाही. भारताची घसरलेली अर्थव्यवस्था आणि वाढणारे घोटाळे, यावर सरकारने श्वेतपत्रिका जारी केली पाहिजे, असे टिष्ट्वट कॉंग्रेसचे प्रवक्ते राजीव गौडा यांनी केले आहे. मोदी हैै तो मंदी हैै, या हॅशटॅगखाली त्यांनी टिष्ट्वट केले आहे. भाजप सरकारच्या नेतृत्वाखाली जीडीपीचा वृद्धी दर घसरणे अपेक्षितच होते, असेही ते म्हणाले.
जगात सर्वांत वेगाने विकास पावणारी अर्थव्यवस्था, हे भारताचे बिरूद आता मागे पडले असून, ती आता चीनच्याही मागे पडली आहे. आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या भारतात जीडीपीचा दर घसरला आहे. कमी ग्राहकी व कमी खाजगी गुंतवणूक हे घटकही जीडीपी वृद्धी दर घसरण्यास कारणीभूत आहेत.
मागील पाच तिमाहीतील जीडीपी विकास दर
एप्रिल-जून २०१८ ८ टक्के
जुलै-सप्टेंबर २०१८ ७ टक्के
आॅक्टोबर-डिसेंबर २०१८ ६.६ टक्के
जानेवारी-मार्च २०१९ ५.८ टक्के
एप्रिल-जून २०१९ ५ टक्के
पहिल्या तिमाहीतील व्यवसायिक क्षेत्रनिहाय विकास दर
१) मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राचा विकास दर ०.६% (मागील वर्षीच्या याच तिमाहीत १२.१% होता)
२) कृषी, मत्स्य क्षेत्राचा विकास २% नोंदला गेला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो ५.१ टक्के होता)
३) खाण क्षेत्राचा विकास २.७% झाला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत तो ०.४% होता)
४) वीज, गॅस व इतर सेवा क्षेत्रांचा विकास ८.६% झाला. (मागील वर्षीच्या याच तिमाहीत ६.७% होता.)
५) बांधकाम क्षेत्राचा विकास ५.७% नोंदला गेला. (मागील वर्षी याच तिमाहीत तो ९.६% होता.)
६) व्यापार, हॉटेल, वाहतूक, संवाद-सेवा क्षेत्राचा विकास दर ७.१% होता. (मागील वर्षी तो ७.८% होता.)
७) वित्त, रिअल इस्टेट व प्रोफेशनल सेवेचा विकास ५.९% नोंदला गेला. (मागील वर्षीच्या तिमाहीत तो ६.५% होता.)
८) सार्वजनिक प्रशासन, संरक्षण व इतर सेवांचा विकास ८.५% होता. (मागील वर्षीच्या तिमाहीत तो ७.५% नोंदला गेला होता.)
देश लवकरच विकास मार्गावर वेगाने धावू शकेल : देशांतर्गत व जागतिक घटकांच्या परिणामामुळे जीडीपीचा वृद्धिदर घसरला. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून, त्यामुळे देश लवकरच विकास मार्गावर वेगाने धावू शकेल.
- के. व्ही. सुब्रह्मण्यम, मुख्य आर्थिक सल्लागार