सुखवार्ता: अर्थव्यवस्था जोमात, चालू तिमाहीत वाढणार नाेकरभरतीचा वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 10:27 AM2021-10-18T10:27:47+5:302021-10-18T10:28:10+5:30
उद्योगसमूहांना भासू लागली अधिक मनुष्यबळाची गरज
नवी दिल्ली : देशातील उद्याेगधंदे आणि व्यवसायांची गाडी रुळावर येत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचीही मागणी वाढू लागली आहे. ऑक्टाेबर ते डिसेंबर या तिमाहीत नाेकर भरती टाॅप गिअरमध्ये राहणार आहे. कंपन्यांकडून हाेणारी भरती गेल्या १८ महिन्यांमधील उच्चांकी पातळीवर राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
टीमलीझ एम्प्लाॅयमेंट आउटलूक रिपाेर्टमध्ये कंपन्यांमधील नाेकरभरतीचा आढावा घेण्यात आला आहे. देशातील २१ क्षेत्रांमधील लघू, मध्यम आणि माेठ्या अशा ६५० कंपन्यांमधील मागणीबाबत सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यानुसार ४१ टक्के कंपन्या तिसऱ्या तिमाहीत नाेकरभरती करण्याच्या विचारात आहेत. हे प्रमाण जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत ३८ टक्के हाेते, तर गेल्यावर्षी हेच प्रमाण १८ टक्के एवढेच हाेते.
अहवालानुसार, कनिष्ठ पातळीवर ३४ टक्के, वरिष्ठ पातळीवर २७ आणि मध्य पातळीवर २४ टक्के भरती करण्याचा कंपन्यांचा विचार आहे. गेल्या महिन्यात मॅनपाॅवर ग्रुप एम्प्लाॅयमेंट आउटलूक सर्व्हेमध्येही ऑक्टाेबर-डिसेंबर या तिमाहीत राेजगार भरतीत वाढ हाेण्याचा अंदाज वर्तविण्यात आला हाेता.
बेंगळुरूमध्ये ६७ टक्के, दिल्लीत ५९, हैदराबादमध्ये ५३, पुण्यात ४६ आणि चेन्नई येथे ४५ टक्के भरती हाेणार असल्याचा अंदाज आहे.
आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणी
क्षेत्रनिहाय विचार केल्यास आयटी क्षेत्रात सर्वाधिक मागणी राहणार आहे. आयटी क्षेत्राकडून ६९ टक्के, शैक्षणिक क्षेत्रात ६४ टक्के, फार्मामध्ये ६१, एफएमसीजीमध्ये ५९ आणि ई-काॅमर्समध्ये ५७ टक्के भरती हाेण्याची शक्यता आहे.
तिसऱ्या लाटेची भीती झाली कमी
कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत बाेलाविण्याची तयारी कंपन्यांकडून हाेत आहे. व्यापक लसीकरण आणि तिसऱ्या लाटेची भीती कमी झाल्याने उद्याेगधंद्यांची गाडी रुळावर येत आहे. सणासुदीच्या काळात मागणीही जाेर धरू लागली आहे. त्यामुळे व्यवसायवृद्धीसाेबतच मनुष्यबळाची मागणीही पूर्ण करण्याची तयारी कंपन्यांनी केली आहे.