'मूडीज्'मुळे देशाची अर्थव्यवस्था संकटातून बाहेर आलीय, या भ्रमात राहू नका - मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 10:44 PM2017-11-18T22:44:18+5:302017-11-18T22:45:54+5:30
आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला. मात्र 'मूडीज्'च्या या निर्णयानंतर भारतातील अर्थव्यवस्था सुधारली व ती संकटातून बाहेर आली आहे, या भ्रमात केंद्र सरकारनं राहू नये, असे परखड मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे.
नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला. मात्र 'मूडीज्'च्या या निर्णयानंतर भारतातील अर्थव्यवस्था सुधारली व ती संकटातून बाहेर आली आहे, या भ्रमात केंद्र सरकारनं राहू नये, असे परखड मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. 'मूडीज्' रेटिंग आल्याने आता देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल या भ्रमात राहू नका असा सल्ला सिंग यांनी दिला आहे. 'मूडीज्' सुमारे 13 वर्षांनी भारताचे मानांकन वाढवले याचा मला आनंद आहे. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेतील संकटं संपलेली नाहीत.
आपल्या देशाला आणखी मोठ्या आर्थिक आव्हानांना सामोरे जायचे आहे. त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सरकारने शोधायचे आहेत. 'मूडीज्' मुळे अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’ आलेले नाहीत, असा टोलाही मनमोहन सिंग यांनी लगावला.
आता मिडनाईट सेलिब्रेशन करा, यशवंत सिन्हांचा जेटलींना टोला
दरम्यान, भाजपावर नाराज असलेले ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यावर टीका करण्याची कुठलीही संधी सोडत नाहीत. मूडीज् या रेटिंग एजन्सीने भारताचे रेटिंग वाढवल्यानंतर जेटली आणि सिन्हा यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक उडाली. मूडीज् च्या रेटिंगमुळे उत्साहित असलेल्या जेटली यांनी ज्यांना आर्थिक सुधारणेबाबत शंका आहे, त्यांनी स्वत:चे गंभीर आकलन केले पाहिजे, असा टोला यशवंत सिन्हा यांना लगावला होता. त्याला सिन्हा यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मूडीजने भारताच्या रेटिंगमध्ये सुधारणा केल्यानंतरही यशवंत सिन्हा यांच्या शंकांचे निरसन झालेले नाही. त्यांनी 'मूडीज्'च्या रेटिंगनंतर सरकारने व्यक्त केलेल्या आनंदावर आक्षेप घेतला. 'मूडीज्'ने रेटिंगमध्ये सुधारणा केल्याने आता संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात मध्यरात्री एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यास हरकत नाही, असा टोला त्यांनी लगावला.
'मूडीज्'ने भारताच्या मानांकनात केलेल्या सुधारणेचे आम्ही स्वागत करतो. केंद्रात सत्तेवर असलेल्या आमच्या सरकारने गेल्या काही वर्षांत आर्थिक सुधारणा करण्यासाठी उचललेल्या सकारात्मक पावलांचा परिणाम या बदललेल्या रेटिंगमध्ये दिसून आला आहे. या बदललेल्या रेटिंगमुळे भारतीय अर्थव्यवस्था अधिक बळकट होण्यास मदत होईल." असे 'मूडीज्'च्या रेटिंगवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना अरुण जेटली म्हणाले होते. तसेच त्यांनी यशवंत सिन्हांनाही टोला लगावला होता.
आंतरराष्ट्रीय रेटिंग्ज एजन्सी 'मूडीज्'ने भारताच्या लोकल आणि फॉरेन करन्सी एश्युअर रेटिंगमध्ये बीएए3 वरुन बीएए2 असा बदल केला आहे. भारत सरकारने लागू केलेल्या जीएसटी, आधार संलग्नता आणि विविध लाभांचे पैसे थेट खात्यात जमा करणे अशी विविध महत्त्वाची पावले उचलण्यात आल्याने 'मूडीज्'ने हा निर्णय घेतला.