अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 03:01 PM2024-11-20T15:01:57+5:302024-11-20T15:11:46+5:30
उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुका सुरू आहेत. दरम्यान, आज निवडणूक आयोगाने मोठी घोषणा केली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सध्या सुरू असलेल्या पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने कडक कारवाई करत सूचना दिल्या आहेत. यूपी पोटनिवडणुकीत काही समुदायांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याच्या समाजवादी पक्षाने सोशल मीडियावर केलेल्या तक्रारींची दखल घेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सीईओ यूपी आणि सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना कडक सूचना दिल्या आहेत. मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
निवडणूक आयोगाने सर्व तक्रारींची तात्काळ दखल घेऊन तत्काळ कारवाई करा, तसेच तक्रारदाराला टॅग करून कोणत्याही पात्र मतदाराला मतदान करण्यापासून रोखू नये, असे म्हटले आहे. कोणत्याही प्रकारची पक्षपाती वृत्ती खपवून घेतली जाणार नाही आणि तक्रार आल्यानंतर कोणी दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल.
निवडणूक आयोगाने सर्व ९ जिल्ह्यांमध्ये तैनात असलेल्या पोलीस आणि सामान्य निरीक्षकांना मतदान शांततेत आणि निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कानपूरमधील अखिलेश यादव यांच्या तक्रारीची दखल घेत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पोटनिवडणुकीत मिळालेल्या विविध तक्रारींवर कारवाई करत निवडणूक आयोगाने मतदारांची तपासणी आणि मतदारांना मतदान करण्यापासून रोखणाऱ्या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याची माहिती पोलिसांनी दिली.