ED ची कारवाई; Xiaomi सह 3 बँकांना नोटीस, 5551 कोटींचा हिशोब मागितला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:18 PM2023-06-09T22:18:46+5:302023-06-09T22:21:43+5:30
Xiaomi India द्वारे अनधिकृतपणे 5,551 कोटी देशाबाहेर पाठवल्याप्रकरणी कारवाई.
नवी दिल्ली: ED ने 5,551 कोटी रुपयांच्या FEMA उल्लंघन प्रकरणी Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे अधिकारी, CFO समीर राव, माजी MD मनू जैन यांच्यासह 3 बँकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. Xiaomi India ने 2014 मध्ये भारतात काम करण्यास सुरुवात केली. ही चीनमधील आघाडीची मोबाइल हँडसेट कंपनी Xiaomi च्या मालकीची उपकंपनी आहे. Xiaomi इंडियाने 2015 पासून आपल्या मूळ कंपनीला पैसे पाठवण्यास सुरुवात केली. ED ला त्यांच्या तपासात असे आढळून आले की, कंपनीने एकूण 5,551.27 कोटी रुपये परदेशी कंपन्यांना पाठवले आहेत.
आता भारतीय परकीय चलन कायद्याचे कथित उल्लंघन केल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. एजन्सीने एका निवेदनात म्हटले की, परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत, न्यायिक प्राधिकरणाने Xiaomi टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, CITI बँक, HSBC बँक आणि ड्यूश बँक एजीच्या दोन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
The Adjudicating Authority has issued SCN to Xiaomi Technology India Private Limited, its officials and 3 banks under FEMA on the basis of complaint filed by the ED with respect to illegal remittances made by the company to the tune of Rs.5551.27 Crore.
— ED (@dir_ed) June 9, 2023
फेमाच्या कलम 37A अन्वये नियुक्त केलेल्या सक्षम अधिकाऱ्याने या जप्तीच्या आदेशाची पुष्टी केली असल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. जप्तीची पुष्टी करताना, प्राधिकरणाने सांगितले की ED चा विश्वास खरा ठरला आहे. 5,551 कोटी रुपयांचे विदेशी चलन Xiaomi India द्वारे अनधिकृतपणे देशाबाहेर पाठवले गेले आहे. फेमा अंतर्गत तपास पूर्ण झाल्यानंतर ईडीकडून कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे.