"विरोधकांना सतावण्यासाठी होतोय ईडी व सीबीआय यंत्रणेचा गैरवापर"
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 06:41 AM2022-09-12T06:41:15+5:302022-09-12T06:41:48+5:30
शरद पवार यांचा मोदी सरकारवर घणाघाती आरोप
नवी दिल्ली : विरोधकांना चूप करण्यासाठी मोदी सरकार ईडी व सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करीत आहे. या आव्हानांचा सामना धैर्याने करण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी तयार राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन रविवारी तालकटोरा स्टेडियममध्ये पार पडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार फौजिया खान, खासदार वंदना चव्हाण, आदी उपस्थित होते. या अधिवेशनाला देशभरातून सात हजारांवर कार्यकर्ते आले होते.
मोदी सरकारच्या काळात कृषी उत्पादनात व एकूण प्रगतीमध्ये घट झाल्याचे सांगून शरद पवार म्हणाले, यूपीएच्या काळात १५० टक्क्यांनी विकास झाला होता. हा दर सध्या केवळ ४४ टक्क्यांवर आला आहे. पंतप्रधान मोदी लाल किल्ल्यावरून महिलांच्या सक्षमीकरणाचे भाषण करतात व त्यांच्याच राज्यात बिल्किस बानोवर अत्याचार करणाऱ्यांवर दया दाखवितात, हा कोणता न्याय आहे, असा सवाल त्यांनी केला.
चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी देशाची दिशाभूल केल्याचा आरोप करून ते म्हणाले, चीनने घुसखोरी केल्याचे स्पष्ट झाले आहे.
अजितदादांचे भाषण हुकले
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे दोन्ही दिवस भाषण होऊ शकले नाही. तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलतील, अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. परंतु त्यांना संधी मिळाली नाही. अधिवेशनाच्या अखेरीस खासदार प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवार यांना भाषणासाठी पाचारण केले खरे, परंतु त्यावेळी अजितदादा व्यासपीठावर उपस्थित नव्हते. यामुळे अजितदादांचे भाषण होऊ शकले नाही.