फोर्टिसचे माजी प्रवर्तक मालविंदरसिंगसह दोघा जणांना ईडीकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 05:37 AM2019-11-15T05:37:00+5:302019-11-15T05:37:04+5:30
मालविंदरसिंग व रेलिगेअर एंटरप्राईजेस लिमिटेडचे (आरइएल) माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गोधवानी यांना मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीने गुरुवारी अटक केली.
नवी दिल्ली : फोर्टिस हेल्थकेअरचे माजी प्रवर्तक मालविंदरसिंग व रेलिगेअर एंटरप्राईजेस लिमिटेडचे (आरइएल) माजी व्यवस्थापकीय संचालक सुनील गोधवानी यांना मनी लाँडरिंगच्या प्रकरणात ईडीने गुरुवारी अटक केली. या दोघांनी रेलिगेअर फिनव्हेस्ट लिमिटेडमध्ये (आरएफएल) अफरातफर केल्याचा आरोप आहे.
या घोटाळ््याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मालविंदरसिंग व सुनील गोधवानी यांना तिहार मध्यवर्ती तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तिथेच ईडीने या दोघांना अटक केली. या घडामोडींची माहिती ईडीचे वकील नितेश राणा यांनी न्यायालयाला दिली. या प्रकरणात मालविंदरसिंग यांचा भाऊ शिविंदर व अन्य दोघे आरोपी कवी अरोरा, अनिल सक्सेना यांनाही तिहार तुरुंगात ठेवले आहे. आरएफएल ही आरइएल समुहाची कंपनी आहे. मालविंदरसिंग व शिविंदरसिंग हे आरएफएल कंपनीचे माजी प्रवर्तक आहेत. हे दोघे व अन्य आरोपींनी घोटाळा केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास सुरू केला आहे.