विरोध, हल्ला तरीही ईडीने टीएमसी नेत्याला अटक केली; रातोरात कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2024 08:53 AM2024-01-06T08:53:25+5:302024-01-06T08:53:53+5:30
ईडीने शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता बनगावच्या शिमुलतला येथील आद्या यांच्या सासरी शोध सुरु केला.
ईडीने पश्चिम बंगालमधील रेशन घोटाळ्यात टीएमसी नेता आणि बोनगाव नगर पालिकेचे माजी अध्यक्ष शंकर आद्या यांना अटक केली आहे. आद्या यांना बंगालच्या उत्तर २४ परगना येथून अटक करण्यात आली आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेची एक टीम बनगाव नगर पालिकेचे माजी अध्यक्ष आद्या यांच्या सासरी गेली होती. तर दुसरी टीम संदेशखाली येथे शाहजहा शेखच्या घरी पोहोचली होती. सुत्रांनुसार शंकर आणि शाहजहा हे दोघेही बंगालचे माजी अन्न मंत्री ज्योतिप्रिय मलिक (बालू) यांचे जवळचे आहेत.
ईडीने शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता बनगावच्या शिमुलतला येथील आद्या यांच्या सासरी शोध सुरु केला. १७ तासांनी ते तेथून निघाले. रात्री उशिरा साडे बारा वाजता त्यांना अटक केली. 2005 मध्ये ते बनगाव नगरपालिकेचे नगरसेवक झाले होते. नंतर सभापतीपदी नियुक्त झाले होते.
शंकर यांच्या पत्नी बनगाव नगरपालिकेच्या अध्यक्षाही राहिल्या आहेत. तपासात सहकार्य करूनही त्यांच्या पतीला ईडीने अटक केली. हे एक मोठे षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला. आद्या यांना ताब्यात घेताना केंद्रीय सुरक्षा दल आणि ईडी टीमला स्थानिक लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.
शुक्रवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास संदेशखळी येथील सरबेरिया येथील टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरी ईडीचे पथक पोहोचले तेव्हा घर बंद होते. सेंट्रल एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी शेखला फोन करून घराबाहेर त्यांच्या येण्याची वाट पाहिली. मात्र कोणीही आले नाही. मग पथकाने शहाजहान शेख यांच्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी तृणमूलचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. त्यांनी गोंधळ घातला आणि ईडी तसेच केंद्रीय दलाच्या सदस्यांवर हल्ला केला. दगडफेकीत ईडी आणि केंद्रीय दलाचे काही सदस्य जखमी झाले. त्यांच्या वाहनांचीही टीएमसी कार्यकर्त्यांनी तोडफोड केली.