PNB SCAM- नीरव मोदी समूहाची 523 कोटींची संपत्ती जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 06:08 PM2018-02-24T18:08:18+5:302018-02-24T18:08:18+5:30
नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची कारवाई सुरूच आहे.
मुंबई- पंजाब नॅशनल बँकेच्या 11300 कोटी रूपयांच्या महाघोट्याळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या नीरव मोदीच्या संपत्तीवर ईडीची कारवाई सुरूच आहे. ईडीने मनीलाँड्रिंग विरोधी कायदा (पीएमएलए) अंतर्गत नीरव मोदी समूहाच्या २१ मालमत्ता जप्त केल्या आहेत. यात फ्लॅट आणि फार्महाऊसचा समावेश आहे. या जप्त केलेल्या संपत्तीची किंमत ५२३ कोटी रुपये असल्याचं समोर येतं आहे.
ईडी नीरव मोदीच्या ठिकाणांवर कारवाई करत आहे. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी एका गोदामावर ईडीने धाड टाकली. यात महागडी घड्याळं ईडीच्या हाती लागली होती. सुमारे १० हजारांच्या आसपास घड्याळं या गोदामात होती. ती १७६ स्टीलची कपाटं, १५८ डबे आणि ६० प्लास्टिकच्या बॉक्समध्ये भरून ठेवली होती.
30 कोटी रूपये बॅलेन्स असणारं खातंही सील
याचबरोबर ईडीने नीरव मोदीच्या बँक खात्यातील 30 करोड रूपयाची रक्कमही सील केली आहे. तसंच 13.86 कोटी रूपयांचे शेअर्सही गोठवले. याआधी ईडीने मोदीच्या 9 आलिशान गाड्या ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. मंगळवारी सीबीआयने अलिबागमधील २७ एकरांमध्ये बनलेल्या मोदीच्या आलिशान फार्महाऊसची तपासणी केली.
ईडीने बजावला तिसरा समन्स
पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीच्या उत्तरावर ईडीने नीरव मोदीला पुन्हा समन्स बजावलं आहे. ईडीकडून नीरव मोदीला पाठविलेलं हे तिसरं समन्स आहे. यामध्ये नीरव मोदीला 26 फेब्रुवारीपर्यंत हजर राहण्याचं बजावण्यात आलं आहे. नीरव मोदी हजर न झाल्यास त्याच्यावर प्रत्यार्पणाची कारवाई केली जाणार आहे.