ED चे मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी छापे; वॉशिंग मशीनमध्ये लपवला कोट्यवधीचा खजिना...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2024 10:01 PM2024-03-26T22:01:18+5:302024-03-26T22:01:52+5:30
शेल कंपन्यांच्या मदतीने 1800 कोटी रुपये सिंगापूरला पाठवल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे.
ED raid:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फेमा प्रकरणात मॅक्रोनियन शिपिंग आणि लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड आणि कंपनीचे संचालक विजय कुमार शुक्ला, संजय गोस्वामी आणि त्यांच्या इतर कंपन्यांवर छापे टाकले. या छापेमारीत 2.54 कोटी रुपये जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, जप्त केलेली रक्कम चक्क वॉशिंग मशिनमध्ये लपवण्यात आली होती. या छापेमारीत आक्षेपार्ह कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.
मुंबईसह या ठिकाणांवर छापे
ईडीने ज्या कंपन्यांवर छापे टाकले, त्यात लक्ष्मीटन मेरीटाइम, हिंदुस्थान इंटरनॅशनल, राजनंदिनी मेटल्स लिमिटेड, स्टीवर्ट अलॉयज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, एमएस भाग्यनगर लिमिटेड, विनायक स्टील्स लिमिटेड, वशिष्ठ कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे. यासोबतच, कंपन्यांचे संचालक आणि भागीदार संदीप गर्ग आणि विनोद केडिया यांच्या दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कुरुक्षेत्र आणि कोलकाता येथील ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
ED has conducted searches under the provisions of FEMA,1999 at the premises of M/s. Capricornian Shipping & Logistics Pvt Ltd and its directors Vijay Kumar Shukla and Sanjay Goswami and associated entities M/s. Laxmiton Maritime, M/s. Hindustan International, M/s. Rajnandini… pic.twitter.com/0EDzrjrlRJ
— ED (@dir_ed) March 26, 2024
भारताबाहेर विदेशी चलन पाठवल्याचा आरोप
या संस्था मोठ्या प्रमाणावर भारताबाहेर परकीय चलन पाठवत असल्याची माहिती ईडीच्या तपासातून समोर आली आहे. हे परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन आहे. गॅलेक्सी शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूर आणि हॉरायझन शिपिंग अँड लॉजिस्टिक प्रायव्हेट लिमिटेड सिंगापूर, या दोन्ही परदेशी संस्था अँथनी डी सिल्वाद्वारे व्यवस्थापित केल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
ईडीने 47 बँक खाती गोठवली
शेल कंपन्यांच्या मदतीने बनावट मालवाहतूक आणि इतर कामांच्या नावाखाली सिंगापूरस्थित संस्थांना 1800 कोटी रुपये दिल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी ईडीने संबंधित संस्थांची 47 बँक खातीही गोठवली आहेत. त्यामुळे आता कंपनीला कोणताही व्यवहार करता येणार नाही. या प्रकरणाच्या तळापर्यंत जाण्यासाठी ईडी जप्त केलेल्या कागदपत्रे आणि उपकरणे तपासत आहे.