झटपट कर्ज अन् ग्राहकांना ताप; पेटीएमसह इतर ॲप्सवर ईडीचा दंडुका; १०६ कोटी रुपये जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 09:45 AM2023-04-01T09:45:10+5:302023-04-01T09:47:51+5:30
चिनी उद्योगपतींचे नियंत्रण असलेल्या या मोबाइल ॲपवर झटपट ऑनलाइन कर्ज देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे.
नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोबाइल ॲपद्वारे झटपट कर्ज देणाऱ्या कंपन्यांवर आपले जाळे फेकले आहे. कर्ज देऊन ग्राहकांना त्रास दिल्याचा आरोपप्रकरणी करण्यात आलेल्या तपासात या ॲप्सच्या बँक खात्यांमध्ये असलेली १०६ कोटी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
चिनी उद्योगपतींचे नियंत्रण असलेल्या या मोबाइल ॲपवर झटपट ऑनलाइन कर्ज देऊन लोकांना त्रास दिल्याचा आरोप आहे. मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडी त्यांची चौकशी करत आहे. ही कारवाई ईडीने रेझरपे, कॅशफ्री, पेटीएम, पेयू पेमेंट ॲप आणि ईझीबझसारख्या पेमेंट प्लॅटफॉर्मवर केली आहे. अलीकडेच केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशातील १३८ बेटिंग ॲप्स व ९४ कर्ज ॲप्स ब्लॉक केले होते. यापूर्वी सरकारने शेकडो चिनी ॲप्सवर बंदी घातली आहे. या ॲप्सवर युजर्सच्या वैयक्तिक डेटाशी खेळल्याचा आरोप होता.
नातेवाईकांनाही धमकावले
या ॲप्सनी अल्प मुदतीचे कर्ज देऊन उच्च प्रक्रिया शुल्क आणि अवाजवी दरांद्वारे लोकांचे नुकसान केले आहे. नंतर या कंपन्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि मित्रांकडून फोनवरून धमकावून आणि मानसिक छळ करून पैशांची मागणी केली. ईडीचे म्हणणे आहे की, या ॲप्सने विविध बँकांमध्ये तयार केलेल्या खात्यांसह मर्चंट आयडीद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँड्रिंग केले. हे गुन्ह्याच्या श्रेणीत येते.
फसवणूक करून कंपन्यांची स्थापना
चीनच्या उद्योगपतींनी बनावट संचालक नेमून या कंपन्या स्थापन केल्याचे तपास संस्थेने म्हटले आहे. या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून, त्यांना संचालक म्हणून नियुक्त केले. त्याच्या पूर्व संमतीशिवाय त्याच्या नावाने बँक खातीही उघडण्यात आली. ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे ॲप्लिकेशन्सवरून अल्प रकमेसाठी कर्ज झटपट वितरित केले गेले. ते परत घेण्यासाठी गुंडांकडून त्रास देण्यात येत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या.
या कंपन्यांवर आरोप
फसवणूक करणाऱ्या या संस्थांमध्ये चिनी नागरिक आणि उद्योगपतींच्या नियंत्रणाखाली असलेल्या तीन फिनटेक कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये मॅड एलिफंट नेटवर्क टेक्नॉलॉजी, बॅरोनिक्स टेक्नॉलॉजी आणि क्लाउड ॲटलस फ्युचर टेक्नॉलॉजी यांचा समावेश आहे.
पेमेंट ॲप्सद्वारे रिअल टाइम व्यवहारांत कोण पुढे?
भारत २,८७५
चीन २,१७५
द. कोरिया ९१०
थायलंड ८२५
इंग्लंड ४५०
वर्ष २०२२ चे आकडे, रक्कम कोटी रुपयांमध्ये