ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीचा दणका; मुंबईसह २५ ठिकाणी छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 06:37 AM2023-05-26T06:37:19+5:302023-05-26T06:37:29+5:30
माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : परदेशात नोंदणी असलेल्या, मात्र भारतातून आर्थिक व्यवहार करणाऱ्या ऑनलाइन गेमिंग कंपन्यांना ईडीने दणका दिला असून या कंपन्यांनी भारतातील ग्राहकांकडून घेतलेले तब्बल ४ हजार कोटी रुपये अवैधरीत्या परदेशात पाठविल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. या प्रकरणी ईडीने मुंबईसह दिल्ली, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश येथील २५ ठिकाणी छापेमारी केली आहे.
माल्टा, सायप्रस अशा लहानशा देशांत या कंपन्यांनी आपल्या कंपनीची नोंदणी केली. मात्र, त्यांच्या आर्थिक व्यवहारांसाठी भारतातील अनेक शहरांतून विविध बँकांत शेकडो बँक खाती सुरू केली. या कामाकरिता आशिष कक्कर, नीरज बेदी, अर्जुन अश्विनभाई अधिकारी, अभिजित खोत या हवाला ऑपरेटर्सची मदत घेतली होती. त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या आधार कार्ड, पॅन कार्ड व मोबाइल क्रमांकाचा वापर करत ही बँक खाती सुरू केली. तसेच हे लोक पाबेलो, जॉन, वॉस्टन अशा बनावट नावाने व्यवहार करत होते. या कंपन्यांच्या वेबसाइटवरून ऑनलाइन गेमिंगची सुविधा देण्यात येत होती, त्यासाठी ग्राहकांकडून पैसे घेतले होते. हे पैसे भरल्यानंतरच ग्राहकांना ऑनलाइन गेम खेळता येत होते. तसेच ज्या लॅपटॉपवरून परदेशात पैसे पाठवले गेले ते लॅपटॉप तसेच १९ लाख रुपयांची रोख रक्कम आणि २६९५ अमेरिकी डॉलरदेखील ईडीने जप्त केले आहेत. याखेरीज कंपनीची ५५ बँक खातीदेखील गोठवण्यात आली आहेत.
फेमा कायद्याचा भंग
nभारतातील ग्राहकांकडून या कंपन्यांनी तब्बल ४ हजार कोटी रुपये गोळा केल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात दिसून आले.
nग्राहकांकडून गोळा केलेले पैसे परदेशात पाठविण्यासाठी परदेशी चलन विनिमय कायद्यामध्ये (फेमा) ज्या तरतुदी आहेत त्याचा भंग करत हे पैसे त्यांनी पाठविल्याचा ठपका ईडीने त्यांच्यावर ठेवला आहे.
nहे पैसे परदेशात पाठविण्यासाठी काही बनावट कंपन्यांची स्थापना करण्यात आली. या कंपन्या आयात-निर्यातीचे काम करत असल्याचे कागदोपत्री दाखवण्यात आले.