“संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत, लाच मागितल्याचे पुरावे”; EDची कोर्टाला माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 04:29 PM2023-10-10T16:29:51+5:302023-10-10T16:32:50+5:30
Sanjay Singh Delhi Liquor Policy Case: संजय सिंह तपासात सहकार्य करत नसून, कोठडी वाढवून द्यावी, अशी विनंती ईडीने कोर्टाला केली.
Sanjay Singh Delhi Liquor Policy Case: आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना मद्य घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली असून, ५ दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर या प्रकरणी झालेल्या सुनावणीत अंमलबजावणी संचालनालयाने संजय सिंह यांच्याविरोधात लाच मागितल्याचे पुरावे असल्याची माहिती देताना ते तपासात सहकार्य करत नसल्याचा दावा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने आणखी ५ दिवसांची कोठडी द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली आहे. ईडीने न्यायालयाला सांगितले की, संजय सिंह यांच्या विरोधात लाच मागितल्याचे पुरावे आहेत. संजय सिंह यांनी लाच मागितली होती, पण पैसे दिलेले नाहीत, असे ईडीने म्हटले आहे.
संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत
ईडीचे म्हणणे आहे की, संजय सिंह तपासात सहकार्य करत नाहीत. त्यांचा जुना मोबाइल आणि त्याचा डेटा मिळालेला नाही. त्या जुन्या मोबाइलबाबत संजय सिंह माहिती देत नाहीत. यावर, ५ दिवसांनंतरही मोबाइल डेटा उपलब्ध झाला नसल्याबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर, आम्ही शोध घेतला असता संजय सिंह यांचा जुना मोबाइल सापडला नाही. अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. आमच्याकडे त्या लोकांची साक्ष आहे, जेथे मोबाइलचा शोध घेण्यात आला, असे ईडीने न्यायालयाला सांगितले.
दरम्यान, एका मद्य व्यावसायिकाकडून ४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. यापूर्वीही असे अनेक परवाने दिल्याचे सांगण्यात आले. हे दिल्ली आणि पंजाबमधील दारूच्या परवान्यांबाबत आहे का? तसेच केवळ लाच मागितली की पैसेही दिले गेले, असे न्यायालयाने विचारले असता, आतापर्यंत फक्त लाच मागितल्याचे पुरावे मिळाले आहेत, असे ईडीने सांगितले.