ईडीने संशयित आरोपीची १४ तास चौकशी करणे शौर्याचे लक्षण नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 08:04 AM2024-09-26T08:04:40+5:302024-09-26T08:04:52+5:30
पंजाब-हरयाणा उच्च न्यायालयाने फटकारले
चंडीगड : मनी लाँडरिंगप्रकरणी संशयित आरोपीची सुमारे १४ तास चौकशी करणे हे काही शौर्याचे लक्षण नाही तर त्यामुळे संंबंधित माणसाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो. त्यामुळे ईडी अधिकाऱ्यांनी संशयित आरोपीची वाजवी कालावधीतच चौकशी केली पाहिजे असे पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने बजावले.
हरयाणा विधानसभा निवडणुकांतील सोनीपत मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुरेंद्र पंवार यांची ईडी केलेली अटक रद्द केली आहे. उच्च न्यायालयाचे न्या. महावीरसिंह सिंधू यांनी हा निकाल दिला. त्यांचे ३७ पानांचा निकालपत्र बुधवारी पंजाब आणि हरयाणा उच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आले.
१९ जुलै रोजी सुरेंद्र पंवार यांची सकाळी ११ ते रात्री १.४० वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. अशा प्रकारे चौकशी करणे हे शौर्य नसून मानवी प्रतिष्ठेच्या विरुद्ध आहे अशा शब्दांत न्यायालयाने ईडीने फटकारले आहे. (वृत्तसंस्था)