ईडीची मोठी कारवाई; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराची ३१५ कोटींची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 12:32 PM2023-10-15T12:32:04+5:302023-10-15T12:33:04+5:30
ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.
मुंबई- ईडीकडून जळगावातील राजमल लखीचंद ज्वेलर्सवर ऑगस्ट महिन्यात छापेमारी करण्यात आली होती. या कारवाईदरम्यान ईडीने तब्बल १ कोटी रुपयांची रोकड आणि ३९ किलोंची सोने आणि हिऱ्यांचे दागिने जप्त केले होते. या दागिन्यांची किंमत तब्बल २५ कोटी रुपयांच्या घरात आहे. राजमल लखीचंद ज्वेलर्सचे मालक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार ईश्वरलाल जैन यांच्यावरील ईडी कारवाईपाठी राजकीय दबाव असल्याची चर्चाही यावेळी झाली होती. आता ईडीने राजमल लखीचंद ज्वेलर्संच्या विविध मालमत्तांवर टाच आणली आहे. ईडीकडून त्यांच्या जंगम व स्थावर अशा ७० मालमत्तांची जप्ती करण्यात आली आहे.
ईश्वरलाल जैन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार आणि पक्षाचे खजिनदार होते. त्यामुळे ईडीच्या या कारवाईचा संबंध शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय वादाशी जोडला जात आहे. १७ ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपासून सक्त वसुली संचालनालयाच्या पथकांकडून राजमल लखीचंद ज्वेलर्संची तपासणी करण्यात येऊन जळगाव, नाशिक, ठाणे येथील शोरूममधून रोख रकमेसह सोन्याचा साठा जप्त करण्यात आला होता. आता ईडीने आरएल समुहाची अनेक ठिकाणची संपत्ती जप्त केली आहे.
ED has provisionally attached 70 immovable assets located in Jalgaon, Mumbai, Thane, Sillod and Kutch among other areas and movable assets, all valued at Rs.315.60 Crore in bank fraud case of M/s Rajmal Lakhichand Jewelers Pvt. Ltd., M/s R L Gold Pvt. Ltd., and M/s Manraj… pic.twitter.com/XrLHcC4LR2
— ED (@dir_ed) October 15, 2023
राजमल लखीचंद ज्वेलर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या बँक फसवणूक प्रकरणात ED ने ही कारवाई केली आहे. त्यानुसार, जळगाव, मुंबई, ठाणे, सिल्लोड आणि कच्छ यासह इतर भागात असलेल्या 70 स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. या सर्व मालमत्तेचे मूल्य रु. 315.60 कोटी एवढे आहे. दरम्यान, आर.एल गोल्ड प्रा. लि. आणि मेसर्स मनराज ज्वेलर्स प्रा. लिमिटेड यांच्यावर पीएमएलए २००२ कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.