हेलिकॉप्टर प्रकरणी त्यागींना ईडीची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2016 05:23 AM2016-04-30T05:23:47+5:302018-01-09T11:08:34+5:30
आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांना समन्स बजावले आहे.
नवी दिल्ली : आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांना समन्स बजावले आहे. ईडी या व्यवहारात ३,६०० कोटी रुपयांच्या हवाला व्यवहाराची चौकशी करीत आहे. केंद्रीय यंत्रणेने हवाई दलाच्या माजी प्रमुखाला बोलावण्याची ही पहिलीच वेळ आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यागी यांना हवाला व्यवहार प्रतिबंधक कायद्यानुसार (पीएमएलए) बजावण्यात आले आहे.
त्यागी यांनी ईडीसमोर कोणत्या तारखेला हजर राहायचे आहे हे सांगण्यात आले नसले तरी त्यांना व्यक्तिश: पुढील आठवड्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यागी यांची यापूर्वी केंद्रीय गुप्तचर खात्याने (सीबीआय) याच प्रकरणात चौकशी केली होती व तीत त्यागी यांनी मी काहीही चुकीचे केलेले नाही, असा दावा केला होता. आॅगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात मिलान (इटली) येथील न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालाच्या पार्श्वभूमीवर त्यागी यांची चौकशी आवश्यक बनली आहे. भारताला अति अति महत्वाच्या व्यक्तिंसाठीच्या १२ हेलिकॉप्टर विक्री व्यवहारात भ्रष्टाचार केल्याच्या आरोपावरून इटलीची संरक्षण आणि एअरोस्पेस क्षेत्रातील मोठी कंपनी फिनमेकॅनिकाचे माजी प्रमुख गियुसेप ओर्सी आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ब्रुनो स्पॅग्नोलिनी यांना शिक्षा सुनावली आहे.
हेलिकॉप्टरच्या खरेदी व्यवहारात आॅगस्टा वेस्टलँडला निविदा भरता याव्यात म्हणून त्यागी यांनी या हेलिकॉप्टरची उंची कमी केली असा त्यांच्यावर आरोप आहे. ते ३१ डिसेंबर २००५ रोजी हवाई दलाचे प्रमुख झाले व २००७ मध्ये सेवानिवृत्त झाले.