केजरीवालांच्या जामीन अर्जाला ईडीकडून विरोध, सबळ पुरावे हाती असल्याचा तपास यंत्रणेचा कोर्टात दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 05:36 AM2024-06-08T05:36:39+5:302024-06-08T05:39:35+5:30
दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामिनासाठी न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाला ईडीने विरोध केला. त्यांचा गंभीर आर्थिक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचे सिद्ध करणारे सबळ पुरावे आमच्याकडे आहेत, असे ईडीने न्यायालयाला सांगितले. दिल्लीतील मद्य धोरणाशी निगडित मनी लाँड्रिंगप्रकरणी केजरीवाल यांना अटक करण्यात आली होती.
विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांना ईडीने सांगितले की, आमच्याकडे केजरीवाल यांच्या विरोधात पुरेसे पुरावे आहेत. अरविंद केजरीवाल यांनी नियमित जामिनासाठी केलेल्या अर्जाबाबतची पुढील सुनावणी १४ जूनला होईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना काही दिवस अंतरिम जामीन मिळाला होता. पण, त्यांची गेल्या रविवारी पुन्हा न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या सुनावणीला केजरीवाल व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून न्यायालयात उपस्थित राहिले. त्यांना सध्या तिहार तुरुंगात ठेवण्यात आले आहे.
अंतरिम जामिनाची मुदत वैद्यकीय कारणांपायी वाढवावी अशी अरविंद केजरीवाल यांनी केलेली विनंती दिल्लीच्या न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत १९ जूनपर्यंत न्यायालयाने वाढ केली होती. मद्य धोरण प्रकरणात त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जामीन मिळावा यासाठी अरविंद केजरीवाल सुप्रीम कोर्टात गेले होते. कोर्टाने त्यांना सशर्त जामीन दिला होता. ही मुदत पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल २ जून रोजी पुन्हा तिहार तुरुंगात परतले होते.
केजरीवालांना जामीन मिळतो, मग मला का नाही? : इम्रान खान
भारतात लोकसभा निवडणुकांमध्ये प्रचार करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन दिला असे उदाहरण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या वतीने न्यायालयात देण्यात आले. आपल्याला कारागृहामध्ये नीट वागणूक दिली जात नाही अशी तक्रारही इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. तेथील सरन्यायाधीश काझी फैज इसा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे इम्रान खान यांनी सांगितले की, माझ्या हातातील सत्ता गेली व त्यानंतर मला सतत लक्ष्य करण्यात येत आहे.