‘ईडी’ने मल्ल्यांभोवतीचा फास आवळला

By admin | Published: March 12, 2016 03:08 AM2016-03-12T03:08:50+5:302016-03-12T04:42:22+5:30

मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनला बस्तान हलविल्याचे वृत्त बाहेर येताच विरोधकांनी संसदेत चौफेर हल्ले चढवत सरकारची केलेली कोंडी पाहता तपास संस्थांनी मल्ल्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली

The ED organized a fence around the malla | ‘ईडी’ने मल्ल्यांभोवतीचा फास आवळला

‘ईडी’ने मल्ल्यांभोवतीचा फास आवळला

Next

नवी दिल्ली : मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी लंडनला बस्तान हलविल्याचे वृत्त बाहेर येताच विरोधकांनी संसदेत चौफेर हल्ले चढवत सरकारची केलेली कोंडी पाहता तपास संस्थांनी मल्ल्यांच्या नाड्या आवळायला सुरुवात केली आहे. शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) ६० वर्षीय मल्ल्या यांना १८ मार्च रोजी व्यक्तिश: हजर होण्याबाबत समन्स बजावला. १७ बँकांचे नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडविल्यामुळे चर्चेत आलेल्या मल्ल्या यांनी पळून गेल्याचा इन्कार केला. मी आंतरराष्ट्रीय व्यावसायिक आहे. माझे विदेशात आणि भारतात येणे-जाणे सुरू असते. मी पळून गेलेलो नाही. मी फरारही नाही. तसा आरोप करणे खोडसाळपणाचे आहे, असे टिष्ट्वट त्यांनी अज्ञात स्थळाहून केले.
दुसरीकडे मल्ल्यांच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सने आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडविल्याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ कार्यकारी अधिकाऱ्याची ईडीने कसून चौकशीही केली. मल्ल्यांना ईडीच्या तपास अधिकाऱ्यांसमक्ष हजर व्हायचे आहे. आयडीबीआय प्रकरणी ईडीने काळा पैसा प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार समन्स बजावला आहे. त्यांना वैयक्तिक आर्थिक व्यवहारासंबंधी कागदपत्रे सादर करण्याचा आदेशही दिला.
बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाईन्सचे माजी मुख्य वित्त अधिकारी (सीएफओ) रघुनाथन यांची ईडीने बल्लार्ड पीयर भागातील कार्यालयात चौकशी केल्यानंतर मल्ल्यांना समन्स पाठविण्यात आला. विविध आर्थिक व्यवहारावर प्रकाश टाकणे महत्त्वाचे असल्यामुळे रघुनाथन यांना प्रश्न विचारणे आवश्यक होते, असे ईडीच्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
अधिकारीही अडकले
ईडीने आयडीबीआय बँक आणि किंगफिशर एअरलाईन्सच्या अर्ध्या डझनावर अधिकाऱ्यांना समन्स पाठवले असून सर्वांना वैयक्तिक आर्थिक व्यवहार, तसेच गत पाच वर्षांतील आयकर रिटर्नबाबत माहिती मागितली आहे. आयडीबीआयचे माजी सीएमडी योगेश अगरवाल आणि अन्य वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही समन्स बजावण्यात आले आहे.
आझाद यांचा सवाल लूक आऊट नोटीसमध्ये बदल का केला
राज्यसभेत शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही मल्ल्यांचा मुद्दा गाजला. गेल्यावर्षी सीबीआयने एकाच महिन्यात मल्ल्यांविरुद्धच्या लूक आऊट नोटीसमध्ये बदल का केला? असा सवाल राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी शून्य तासाला केला. मल्ल्या देश सोडून जाणार असतील तर त्यांना ताब्यात घ्यावे असा आदेश सीबीआयने आॅक्टोबर २०१५ मध्ये लूक आऊट नोटिशीत दिला होता. नोव्हेंबरमध्ये या आदेशात बदल करण्यात आला. ते देश सोडून गेल्यास केवळ माहिती दिली जावी असा तो बदल होता. सीबीआय नोटीसमध्ये बदल करण्याची गरज का भासली, असेही त्यांनी म्हटले.
>> मी भारतीय खासदार, मी पळून गेलेलो नाही - मल्या
 मी भारतीय खासदार आहे. मी देशाच्या कायद्याचे पालन आणि आदर करतो. आपली न्यायालयीन व्यवस्था सुदृढ आणि आदरणीय आहे, मात्र प्रसिद्धी माध्यमांनी ‘मीडिया ट्रायल’ चालवू नये. प्रसिद्धी माध्यमांनी आग भडकवली की सत्य आणि तथ्यांची जळून राख होते.
 मीडिया बॉसेसना मी अनेक वर्षे केलेली मदत, ठेवलेली मेहेरनजर, विमान प्रवासासारख्या सवलती विसरता येणार नाही. आता त्यांनी टीआरपीसाठी खोटे बोलू नये, असेही मल्ल्यांनी म्हटले. मल्ल्यांनी संपत्ती घोषित करावी या वृत्तावर ते भडकले. बँकांना माझी संपत्ती माहीत नाही काय? माझा संसदेत सादर केलेला संपत्तीचा तपशील बघावा, असेही ते म्हणाले.
भारतातून अचानक लंडनला निघून गेलेले विजय मल्ल्या यांनी आपण पळून गेलेलो नाही आणि या देशाच्या कायद्याचे आपण पालन व आदर करतो, असे ट्विट केले आहे. दरम्यान, ईडीने किंगफिशर एअरलाइन्सचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी ए. रंगनाथन यांची कसून चौकशी केली. एअरलाइन्स सुरू करण्यासाठी घेतलेल्या कर्जांचा कसा वापर केला, हे जाणून घेणे हा या चौकशीचा उद्देश होता. कर्जातील मोठी रक्कम परदेशात गेली असावी, असे ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रतिनिधीला सांगितले.

 

Web Title: The ED organized a fence around the malla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.