आखाती देशांमध्ये १३ हजार लोकांचे नेटवर्क, हवालाद्वारे निधी... पीएफआय संदर्भात ईडीचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 10:53 AM2024-10-21T10:53:06+5:302024-10-21T10:53:42+5:30
चार वर्षांच्या तपासानंतर ईडीने तयार केलेल्या डॉजियरमध्ये पीएफआयचे अनेक सदस्य असल्याचे समोर आले आहे.
नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (PFI) नेटवर्क आणि वित्त स्रोत तपासण्यासाठी संघटनेच्याविरोधात अनेक एजन्सींची चौकशी सुरु केली होती. चार वर्षांच्या तपासानंतर ईडीने तयार केलेल्या डॉजियरमध्ये पीएफआयचे अनेक सदस्य असल्याचे समोर आले आहे. यासोबतच केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, जम्मू-काश्मीर आणि मणिपूर येथे कार्यालये आहेत.
ईडीच्या डॉजियरनुसार, या संघटनेवर २०२२ मध्ये भारतात बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत बंदी घालण्यात आली होती. दरम्यान, सिंगापूर आणि पाच आखाती देशांमध्ये संघटनेचे किमान १३००० सदस्य आहेत. या देशांतील पीएफआयला 'अज्ञात देणगीदारांकडून' रोखीने निधी दिला जातो. तसेच, ते हवालाद्वारे भारतात पाठवले जाते. यानंतर ट्रस्ट आणि संलग्न संस्थांच्या २९ बँक खात्यांमध्ये रोख रक्कम जमा करण्यात आली.
'या' प्रमुख लोकांना अटक
गेल्या काही वर्षांत एजन्सीने पीएफआय संघटनेच्या २६ उच्च पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. भारतातील आणि परदेशातील मालमत्ता आणि बँक खाती जप्त करण्यात आली आहेत. केरळमध्येही एक दहशतवादी अड्डा सापडला होता. दिल्ली दंगल, हाथरसमधील अशांतता आणि जुलै २०२२ मध्ये पाटणा येथे पंतप्रधान मोदींच्या रॅलीदरम्यान झालेल्या हल्ल्यामागे या संघटनेचा हात असल्याचे डॉजियरमध्ये नमूद करण्यात आले आहे. २०२० पासून अटक करण्यात आलेल्यांमध्ये कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाचे (CFI) राष्ट्रीय सरचिटणीस रौफ शेरीफ, कतारमधील पीएफआय सदस्य शफीक पायथ, दिल्ली पीएफआय अध्यक्ष परवेझ अहमद आणि सिंगापूरहून पीएफआयसाठी हवाला व्यवसाय करणारे साहुल हमीद हे प्रमुख आहेत.
जिहादच्या माध्यमातून इस्लामी चळवळीचा कट
ईडीने म्हटले आहे की, पीएफआयच्या वास्तविक उद्दिष्टांमध्ये जिहादद्वारे भारतात इस्लामिक चळवळ चालवणे आहे. दरम्यान, पीएफआय स्वतःला एक सामाजिक चळवळ म्हणून प्रस्तुत करते. पीएफआयने अवलंबलेल्या निषेधाच्या पद्धती हिंसक स्वरूपाच्या असल्याचे पुराव्यावरून दिसून येते. ईडीने सांगितले की, केरळच्या कन्नूर जिल्ह्यातील नरथमध्ये शस्त्र प्रशिक्षण शिबिर आढळून आले. तेथे पीएफआय शारीरिक शिक्षण वर्गाच्या नावाखाली स्फोटके आणि शस्त्रे वापरण्याचे प्रशिक्षण देत होते.
९४ कोटींहून अधिक वसुलीचा खुलासा
आतापर्यंत, मनी ट्रेलने पीएफआय आणि त्याच्या सहयोगींनी ९४ कोटींहून अधिकची वसुलीचा खुलासा केला आहे. ईडीने ५७ कोटी रुपयांच्या ३५ मालमत्ता जप्त केल्या आहेत, त्यांना 'गुन्ह्याची रक्कम' म्हणून संबोधले आहे. ही संघटना कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएईमध्ये सक्रिय असल्याचे आढळून आले आहे. पीएफआयला बहुतेक निधी या देशांकडून मिळतो. ईडीने म्हटले आहे की, पीएफआयने आखाती देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिम प्रवासींसाठी जिल्हा कार्यकारी समित्या स्थापन केल्या आहेत. त्या भारतात आणि परदेशात निधी उभारत आहे. हा पैसा देशातील दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात आहे.