आपच्या खासदारावर ईडीची छापेमारी; फायनान्सरही कचाट्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 12:02 PM2024-10-07T12:02:04+5:302024-10-07T12:02:21+5:30
सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत.
आपचे नेते एकामागोमाग एक असे ईडीच्या रडारवर आहेत. सिसोदिया, केजरीवाल यांच्यानंतर ईडीने लुधियानाचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरी छापे मारले आहेत. याचबरोबर फायनान्सर हेमंत सूद यांच्या जागांवरही छापेमारी करण्यात आली आहे.
सोमवारी सकाळीच ईडीच्या टीमने अरोरा आणि त्यांच्या काही निकटवर्तीयांच्या ठिकाण्यांवर छापे टाकले आहेत. सूद हे माजी कॅबिनेट मंत्री भारत भूषण आशु यांचे निकटवर्तीय आहेत. धान्य वाहतूक घोटाळ्यात आशुचे नाव आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तपासात परदेशी चलनातून व्यवहारही झाल्याचे समोर आले आहे.
ईडीचे अधिकारी सकाळी चंदीगढ रोडवरील सूद यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही. परंतू, तपासात अनेक कागदपत्रे ताब्यात घेण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर काँम्प्युटरमधील डेटाचीही तपासणी सुरु करण्यात आली आहे.
या छाप्यावर आपने प्रतिक्रिया दिली आहे. सिसोदिया यांनी एक्सवरील पोस्टमध्ये मोदींनी आज पुन्हा पोपटाला खुले सोडले आहे. आज सकाळपासून आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोरा यांच्या घरावर ईडीवाल्यांचा छापा पडला आहे, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे.
तर दुसरीकडे अरोरा यांनी सांगितले की, मी कायद्याचे पालन करणारा नागरिक आहे. छापे मारीचे कारण काय आहे याची माहिती नाही. परंतू एजन्सींना पूर्ण सहकार्य करणार आहे. तसेच त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जाणार आहेत.