ज्यांनी बुडालेले लवासा विकत घेतले, त्यांचे दिवस फिरले; मुंबई, गोव्यात ईडीने धाड टाकली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 02:32 PM2024-03-22T14:32:29+5:302024-03-22T14:33:10+5:30
Enforcement Directorate Raid on Lavasa Owner: दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ८० लाख रुपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी संबंधित असलेला पुण्यातील प्रकल्प लवासा बुडाला होता. हा प्रकल्प अजय सिंह यांच्या डार्विन कंपनीने तब्बल १८०० कोटी रुपये मोजून विकत घेतला होता. आता ही कंपनी आणि संबंधित कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या असून दिल्ली, मुंबई, गोव्यात अशा नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांत ८० लाख रुपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
ईडीने डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कंपनीवर छापे मारले आहेत. ही कंपनी कायदेशीर, ऑडिटिंग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करते. अजय सिंह आणि त्याच्या साथीदारांच्या ठिकाण्यांहून ७८ लाख रुपये भारतीय चलन, २ लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. हरिप्रसाद अकालू पासवान आणि रमेश यादव कुमार हे या कंपनीचे संचालक असून ती लवासा विकत घेतलेल्या डार्विन कंपनीचे मालक अजय सिंह यांच्या नियंत्रणात आहे.
डलेमन आणि इतरांनी वेस्टिज मार्केटिंग कंपनीच्या बँक खात्यातून फसवणूक करत १८ कोटी रुपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप आहे. याच दिवशी ही रक्कम डलेमनच्या बँक खात्यातून डार्विन ग्रुप ऑफ कंपनीजच्या अनेक बँक खात्यांमध्ये तसेच अजय सिंहच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.
वेस्टिज मार्केटिंगच्या तक्रारीवरून याची चौकशी केली असता डलेमनचे संचालक हे बोगस असल्याचे समोर आले. या गैरव्यवहाराचा फायदा थेट अजय सिंह यांच्या मालकीची कंपनी डार्विनला झाल्याचे समोर आले आहे. ही तिच कंपनी आहे जी गेल्या वर्षी लवासा प्रकल्प विकत घेऊन चर्चेत आली होती. डार्विन कंपनीने २०२१ मध्ये लवासा कॉर्पोरेशन विकत घेण्यासाठी १ हजार ८१४ कोटी रुपयांची बोली लावली होती. त्यावर कमिटी ऑफ क्रेडिटर्सने शिक्कामोर्तब केल्यानंतरही लवासा दिवाळखोरीत असल्याने एनसीएलटीची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी मिळाल्यानंतर डार्विन कंपनीला लवासाचा ताबा मिळाला होता.