'धनकुबेर' माजी आमदार दिलबाग सिंह यांच्या घरावर ED चा छापा; 5 कोटी रोख, 300 काडतुसे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 10:12 AM2024-01-05T10:12:03+5:302024-01-05T10:14:20+5:30
माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधित असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले.
ईडीने गुरुवारी सकाळी बेकायदेशीर खाण प्रकरणात हरियाणातील काँग्रेसचे आमदार सुरेंद्र पंवार, इंडियन नॅशनल लोकदल (INLD) चे माजी आमदार दिलबाग सिंह आणि इतरांशी संबंधित असलेल्या 20 हून अधिक ठिकाणांवर छापे टाकले. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग एक्ट (PMLA) अंतर्गत यमुनानगर, सोनीपत, मोहाली, फरिदाबाद, चंदीगड आणि कर्नाल येथे तपास यंत्रणेने विविध ठिकाणी शोध घेतला. 24 तास उलटूनही केंद्रीय यंत्रणेची कारवाई सुरूच आहे.
ईडीच्या सूत्रांनी शुक्रवारी सकाळी दिलेल्या माहितीनुसार, माजी आमदार दिलबाग सिंह आणि त्यांच्या साथीदारांच्या घरातून अवैध विदेशी शस्त्रे, 300 काडतुसे, 100 हून अधिक दारूच्या बाटल्या आणि 5 कोटी रुपये रोख, 4/5 किलो सोन्याची बिस्किटे जप्त करण्यात आली आहेत. तसेच भारतासह परदेशातील अनेक मालमत्ता समोर आल्या आहेत.
सुरेंद्र पंवार हे सोनीपतमधून हरियाणा विधानसभेचे सदस्य आहेत, तर दिलबाग सिंह हे यमुनानगर मतदारसंघातून इंडियन नॅशनल लोकदलाचे माजी आमदार आहेत. सोनीपतमधील काँग्रेस आमदार सुरेंद्र पंवार यांच्या घरावर गेल्या 24 तासांपासून ईडीची छापेमारी सुरू आहे. बेकायदेशीर खाण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात ईडीचे अधिकारी काँग्रेस आमदाराकडून माहिती गोळा करत आहेत.
काल सकाळी 8 च्या सुमारास ईडीचे अधिकारी आणि सीआयएसएफचे जवान 5 वेगवेगळ्या वाहनांतून सुरेंद्र पंवार यांच्या घरी पोहोचले. न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. सुरेंद्र पंवार यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.