पंजाबमध्ये ईडीची मोठी कारवाई, भोला ड्रग्ज प्रकरणी १३ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2024 11:39 AM2024-05-29T11:39:24+5:302024-05-29T11:41:11+5:30
Illegal mining case : आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
पंजाब : बेकायदेशीर खाणकाम आणि भोला ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली. ईडीने पंजाबमधील रूपनगर जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. या छाप्यादरम्यान ईडीने आतापर्यंत तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगदीश सिंग उर्फ भोला ड्रग्स प्रकरणात ईडीने जप्त केलेल्या जमिनीवर बेकायदेशीर खाणकाम केले जात असल्याचे चौकशीत आढळले होते, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
नसीब चंद आणि श्री राम क्रशर यांचा अवैध खाण प्रकरणात सहभाग असल्याचे सूत्रांनी सांगितले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, छाप्यादरम्यान आतापर्यंत सुमारे ३ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्यान, हे ड्रग्ज मनी लाँड्रिंग प्रकरण कोट्यावधी रुपयांच्या सिंथेटिक अंमली पदार्थांच्या रॅकेटशी संबंधित आहे, जे २०१३-१४ दरम्यान पंजाबमध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणी ईडीने पंजाब पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे गुन्हा दाखल केला होता, जो सामान्यतः भोला ड्रग्ज केस म्हणून ओळखला जातो.
कुस्तीपटू ते पोलीस बनलेला ड्रग्ज माफिया जगदीश सिंग उर्फ भोला हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. भोलाला ईडीने जानेवारी २०१४ मध्ये अटक केली होती. सध्या पंजाबच्या पीएमएलए न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. दरम्यान, जगदीश भोलाला भारतीय कुस्तीचा 'किंगकाँग' म्हटले जात होते आणि त्याला प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. १९९१ मध्ये दिल्ली येथे झालेल्या आशियाई कुस्ती स्पर्धेत भोलाने रौप्य पदक जिंकले होते.
२००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या रुस्तम-ए-हिंद या पंजाबी भाषेतील चित्रपटातही भोलाने भूमिका साकारली होती. निलंबित होण्यापूर्वी भोलाने काही काळ पंजाब पोलिसात डीएसपी म्हणून काम केले होते. मुंबई पोलिसांनी जगदीश सिंग उर्फ भोला याला २००८ मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. यानंतर सरकारने त्याच्याकडून अर्जुन पुरस्कार काढून घेतला आणि पंजाब पोलिसांनी त्यांना डीएसपी पदावरून निलंबित केले.