लालू यादव यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन ‘घोटाळा’प्रकरणी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2023 06:23 AM2023-03-11T06:23:09+5:302023-03-11T06:23:36+5:30
केंद्रीय सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासह दोन डझन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.
एस. पी. सिन्हा/विभाष झा
नवी दिल्ली/पाटणा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुली तसेच राजद नेत्यांच्या ठिकाणांसह बिहारमधील अनेक शहरांत व इतर ठिकाणी छापे टाकले. लालूप्रसाद यांच्या मुली रागिणी यादव, चंदा यादव, हेमा यादव व राजदचे माजी आमदार अबू दोजाना यांच्याशी संबंधित पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची व मुंबई येथील ठिकाणांची झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीबीआय आणि ईडी दुसऱ्या कोणाच्या तरी संहितेचे अनुसरण करून विरोधी नेत्यांच्या घरांवर छापे टाकत आहेत. ताजे छापे हे गेल्या ऑगस्टमध्ये बिहारमधील सरकार बदलाची “प्रतिक्रिया” आहे, असा आरोप राजदचे नेते मनोज झा यांनी केला आहे.
दोन डझन ठिकाणी छापे
केंद्रीय सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासह दोन डझन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. लालू यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दक्षिण दिल्लीतील घराचाही यात समावेश असल्याचे सांगण्यात आले. तथापि, छाप्याच्या वेळी तेजस्वी यादव तेथे उपस्थित होते की नाही, हे स्पष्ट झाले नाही.
काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण कथितरित्या रेल्वेत नोकऱ्या दिल्याच्या बदल्यात यादव कुटुंब व त्याच्या सहकाऱ्यांना भेट म्हणून किंवा स्वस्त दरात जमिनी दिल्याशी संबंधित आहे.
सीबीआयने लालूप्रसाद, त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींसह अन्य १४ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल केले असून, सर्व आरोपींना १५ मार्च रोजी हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.